Mumbai : मोदींच्या उपस्थितीत NESCO मधील इव्हेंटदरम्यान टॉयलेटमध्ये बेशुद्ध पडले होते माजी ऑस्ट्रेलियन मंत्री; तातडीच्या मदतीने वाचला जीव

“मी सभागृहात बसून पंतप्रधान मोदींचं भाषण सुरू होण्याची वाट पाहत होतो. अचानक माझ्या पोटात खूप दुखायला लागलं आणि मी हॉलच्या मागच्या बाजूला असलेल्या टॉयलेटमध्ये गेलो. प्रचंड घाम येत होता, चक्कर येत होती. गरम झाल्यामुळे मी शर्ट काढलं आणि पडू नये म्हणून जमिनीवर आडवं झोपण्याचा निर्णय घेतला.”
Mumbai : मोदींच्या उपस्थितीत NESCO मधील इव्हेंटदरम्यान टॉयलेटमध्ये बेशुद्ध पडले होते माजी ऑस्ट्रेलियन मंत्री; तातडीच्या मदतीने वाचला जीव
Mumbai : मोदींच्या उपस्थितीत NESCO मधील इव्हेंटदरम्यान टॉयलेटमध्ये बेशुद्ध पडले होते माजी ऑस्ट्रेलियन मंत्री; तातडीच्या मदतीने वाचला जीव
Published on

मुंबई : गोरेगाव येथील नेस्को सेंटरमध्ये २७ ते ३१ ऑक्टोबरदरम्यान झालेल्या मॅरिटाईम एक्झिबिशनमध्ये ऑस्ट्रेलियाचे माजी मंत्री अँड्र्यू जॉन रॉब (वय ७२) हे कार्यक्रमादरम्यान अचानक टॉयलेटमध्ये कोसळून बेशुद्ध पडले होते, असा खुलासा झाला आहे. २९ ऑक्टोबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन झालेल्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी रॉब मुंबईत आले होते. सुदैवाने मुंबई पोलिस आणि कर्तव्यावर असलेल्या डॉक्टरांच्या तत्परतेने मोठा अनर्थ टळला.

नेमकं काय घडलं?

वनराई पोलिसांच्या माहितीनुसार, दुपारी ४:३५ वाजताच्या सुमारास पंतप्रधानांचा कार्यक्रम सुरू असतानाच अचानक संदेश आला की एक परदेशी प्रतिनिधी टॉयलेटमध्ये कोसळला आहे. पोलिस कर्मचारी धावत घटनास्थळी पोहोचले. तेव्हा रॉब हे अर्धबेशुद्ध अवस्थेत पडलेले होते, मात्र श्वासोच्छ्वास सुरू होता. तत्काळ अँब्युलन्स बोलावण्यात आली आणि त्यांना ट्रॉमा केअर हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलं. तिथे डॉक्टर्सनी तातडीने उपचार सुरू केले.

ओळख कशी पटली?

सर्वप्रथम घटनास्थळाची पाहणी करताना पोलिसांना रॉब यांच्या नावाचा केवळ एक्झिबिशन पास सापडला होता. त्यानंतर रॉब यांना हॉस्पिटलमध्ये नेल्यावर त्यांच्याजवळ ग्रँड हयात हॉटेलचे की-कार्ड आणि व्हिजिटिंग कार्ड सापडले. पोलिसांनी लगेच हॉटेलमध्ये संपर्क साधून घडलेली घटना सांगितली आणि ओळख पटवण्यात आली. हॉटेलमधील कर्मचाऱ्यांनी ते ऑस्ट्रेलियाचे माजी ट्रेड अँड इन्व्हेस्टमेंट मंत्री अँड्र्यू जॉन रॉब (वय ७२) असल्याचा दुजोरा देताच ऑस्ट्रेलियन वाणिज्य दूतावासाला कळवण्यात आलं.

‘मला वाटलं मी कोसळणारच’

अलीकडेच 'मिड-डे'शी बोलताना रॉब यांनी घडलेला प्रसंग सांगितला. ते म्हणाले, “मी सभागृहात बसून पंतप्रधान मोदींचं भाषण सुरू होण्याची वाट पाहत होतो. भारत-ऑस्ट्रेलिया मुक्त व्यापार कराराच्या चर्चेदरम्यान त्यांच्याशी अनेकदा संवाद झाल्याने मला त्यांच्याबद्दल मोठा आदर आहे. अचानक माझ्या पोटात खूप दुखायला लागलं, तीव्र वेदनांमुळे मी हॉलच्या मागच्या बाजूला असलेल्या टॉयलेटमध्ये गेलो. प्रचंड घाम येत होता, चक्कर येत होती. गरम झाल्यामुळे मी शर्ट काढलं आणि पडू नये म्हणून जमिनीवर आडवं झोपण्याचा निर्णय घेतला.”

ते पुढे म्हणाले, “अतिशय तीव्र डिहायड्रेशनमुळे मी बेशुद्ध पडलो असेल. बहुतेक माझा हात दाराखालून बाहेर गेला असावा, त्यामुळे कोणाच्यातरी लक्षात आलं आणि त्यांनी लगेच पोलिसांना कळवलं. शुद्धीवर आलो तेव्हा माझ्या आजूबाजूला पोलिस उभे होते. प्रथम पोलिसांना मी ड्रग्स घेतल्याचा संशय आला असावा. पण लगेच त्यांना समजलं की माझी तब्येत बिघडली आहे. त्यांनी मला अँब्युलन्सपर्यंत नेलं. रुग्णालयात डॉक्टरांनी तत्काळ उपचार सुरू केले. डिहायड्रेशन कमी करण्यासाठी कॅन्युला लावला, अँटिबायोटिक्स दिले. त्यानंतर सीटी स्कॅन, अल्ट्रासाऊंड, एक्स-रे आणि रक्त तपासणी अशा अनेक चाचण्या करण्यात आल्या. मला मिळालेल्या उपचारांमध्ये किंवा तत्परतेत कसलीच उणीव नव्हती.”

डॉ. प्रवीण बांगर यांचे मानले विशेष आभार

ट्रॉमा केअर हॉस्पिटलचे डॉ. प्रवीण बांगर यांना पाठवलेल्या मेसेजमध्ये रॉब यांनी विशेष आभार मानले. “मला झालेल्या तीव्र गॅस्ट्रोएन्टेरायटिसच्या वेळी आपण आणि आपल्या टीमने दिलेला उत्कृष्ट उपचार आणि काळजीबद्दल मी मनःपूर्वक आभारी आहे. येथे केलेल्या चाचण्या आणि उपचार माझ्या ऑस्ट्रेलियातील डॉक्टरांनीही योग्य आणि सर्वसमावेशक असल्याचे सांगितले.”

रुग्णालयात दोन दिवस निरीक्षण

डॉक्टरांनी सांगितलं की तीव्र गॅस्ट्रोएन्टेरायटिसमुळे रॉब यांचे शरीर पूर्णपणे डिहायड्रेट झाले होते. ट्रॉमा केअरमध्ये प्रकृती स्थिर झाल्यानंतर त्यांना पुढील उपचारांसाठी ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलं. तिथे दोन दिवस निरीक्षणाखाली ठेवून नंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, वेळेत मदत न मिळाली असती तर परिस्थिती गंभीर वळण घेऊ शकत होती. पोलिस, अँब्युलन्स कर्मचारी आणि डॉक्टरांच्या तातडीच्या समन्वयामुळे आणि तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला.

logo
marathi.freepressjournal.in