

मुंबई : दक्षिण मुंबईच्या वाळकेश्वर येथील ऐतिहासिक बाणगंगा तलावात बुडून शेखर हरीश रावल (१९) या तरुणाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शनिवारी दुपारी घडली. अग्निशमन दलाच्या जवानांनी तत्काळ बचावकार्य हाती घेऊन तरुणाला तलावातून बाहेर काढले आणि एलिझाबेथ रुग्णालयात दाखल केले. मात्र रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.
अग्निशमन दलाकडून मिळालेल्या माहितीनुसार, दुपारी १.१० वाजण्याच्या सुमारास बाणगंगा तलावात एक व्यक्ती बुडाल्याची माहिती मिळाली. त्यानंतर अग्निशमन दल, पोलीस, १०८ क्रमांकाची रुग्णवाहिका सेवा आणि संबंधित विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाच्या जवानांनी बचावकार्य राबवून तरुणाला तलावातून बाहेर काढले. त्याला तातडीने एलिझाबेथ रुग्णालयात दाखल केले. मात्र रुग्णालयात दाखल करण्यापूर्वी त्याचा मृत्यू झाल्याचे रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आले.
या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत असून, पोहण्यासाठी किंवा जलाशयांमध्ये उतरताना आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. पोलिसांकडून या प्रकरणी पुढील तपास सुरू आहे.