

मुंबई : वरळी बीडीडी चाळीतील रहिवाशांच्या निर्माणाधीन घरांची लॉटरी म्हाडामार्फत लवकरच काढण्यात येणार आहे. ही लॉटरी तात्पुरत्या कालावधीसाठी स्थगित करून इमारतीचे पुनर्वसन कोणत्या ठिकाणी होणार त्याचे रहिवाशांसमोर सादरीकरण करावे आणि रहिवाशांच्या मनामधील संभ्रम दूर करावा, अशी मागणी अखिल बीडीडी चाळ भाडेकरू हक्क संरक्षण समितीने मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे केली आहे.
वरळी बी.डी.डी.चाळीच्या पुनर्विकासाला रहिवाशांकडून विरोध नाही. मात्र, या आधी चुकीच्या पद्धतीने काढण्यात आलेली लॉटरीचा अनुभव पाहता समितीने यापुढील लॉटरी आधी रहिवाशांमधील संभ्रम दूर करण्याची मागणी केली आहे. वरळी बी.डी.डी. चाळीत मिश्र लोकवस्ती आहे. बीडीडी चाळ ४१, ४२, १०० या चाळी मुस्लीम बहुल आहेत तर।बीडीडी चाळ ११०, १११, ११२, ११५ या तेलगू (पद्मशाली) समाजाच्या आहे. बीडीडी चाळ ९४, ९५, ९६, ९७, ९८,९९,८८,८९ या बौद्ध समाजाच्या आहेत. ११३, ११४ या मराठा समाजाची वस्ती असलेल्या चाळी आहेत. ११६, ११८ या इमारती समाजकल्याण विभागाच्यासाठी राखीव होस्टेल आहेत. त्यामुळे त्यांचे साजरे होणारे सण, उत्सव हे भिन्न असून भविष्यात त्यामुळे सामाजिक ऐक्याला बाधा येऊ शकते. त्यामुळेच रहिवाशांसोबत संवाद साधून त्यांच्या प्रश्नांचे निरसन केल्यानंतरच लॉटरी काढण्यात यावी, अशी मागणी समितीचे सरचिटणीस किरण माने यांनी केली आहे.