बेस्टला उतरती कळा! चार वर्षांत ७३ बसमार्ग बंद; फक्त 'इतकेच' नवीन बसमार्ग प्रवासी सेवेत

‘ना नफा, ना तोटा’ या तत्त्वावर चालणाऱ्या बेस्ट उपक्रमाची डोकेदुखी दिवसेंदिवस वाढत आहे. प्रवाशांना अधिकाधिक सुविधा उपलब्ध करून देण्याचा दावा करणाऱ्या बेस्ट उपक्रमाला
(संग्रहित छायाचित्र)
(संग्रहित छायाचित्र)

मुंबई : ‘ना नफा, ना तोटा’ या तत्त्वावर चालणाऱ्या बेस्ट उपक्रमाची डोकेदुखी दिवसेंदिवस वाढत आहे. प्रवाशांना अधिकाधिक सुविधा उपलब्ध करून देण्याचा दावा करणाऱ्या बेस्ट उपक्रमाला कार्यान्वित बसमार्ग सुरू ठेवण्यात दमछाक झाली असून गेल्या चार वर्षांत तब्बल ७३ बसमार्ग बंद झाल्याने बेस्टला उतरती कळा लागली आहे. दरम्यान, ३० नवीन बसमार्ग सुरू केल्याचे बेस्ट उपक्रमाकडून सांगण्यात आले.

मुंबईकरांची दुसरी लाइफलाईन म्हणून बेस्ट बसेसची ओळख आहे. सुरक्षित व आरामदायी प्रवास म्हणून प्रवासी आजही बेस्ट बसेसना पसंती देतात. मात्र गेल्या काही वर्षांत बेस्ट उपक्रमाची कोंडी वाढली आहे. १० वर्षांपूर्वी बेस्टच्या ताफ्यात ५ हजार बसेस आणि ५५ लाख प्रवासी प्रवास करत होते. मात्र हाच आकडा घसरला असून सद्यस्थितीत ३ हजार बसेस असून २८ लाख प्रवासी प्रवास करतात. प्रवाशांचा प्रवास गारेगार व्हावा, यासाठी भाडेतत्त्वावरील इलेक्ट्रिक वातानुकूलित बसेस दाखल करण्यात येत आहेत.

२०२६ पर्यंत ७ हजार बसेसचा ताफा बेस्टच्या ताफ्यात सामील होईल, असा दावा बेस्ट उपक्रमाकडून करण्यात येतो. यात २०० डबलडेकर बसेसचा समावेश आहे. मात्र आतापर्यंत फक्त ५० डबलडेकर बसेस दाखल झाल्या असून ७०० बसेसचा पुरवठा करणाऱ्या कॉसिस कंपनीने नकार दिला आहे. त्यामुळे दोन वर्षांपासून बसेसची संख्या तीन हजारांवर अडकली आहे. त्यात बेस्ट उपक्रमाच्या स्वमालकीच्या १,०९५ बसेसची वयोमर्यादा संपुष्टात येत असल्याने पुढील काही वर्षांत त्या भंगारात काढण्यात येणार आहे. त्यामुळे बसेस अभावी प्रवाशांची परवड होत असून हळुवार बस मार्ग बंद करण्याची वेळ बेस्ट उपक्रमावर ओढावली आहे.

सायन पूल बंदीनंतर आणखी ४० मार्गांवर परिणाम!

मध्य रेल्वेच्या अखत्यारित असलेला ११० वर्षे जुना सायन स्थानकातील ब्रिटिशकालीन रोड ओव्हर पूल वाहतुकीसाठी दोन वर्षे बंद करण्यात येणार आहे. त्यामुळे बेस्ट उपक्रमास १५ ते २० मार्ग बंद करावे लागतील, असे सांगण्यात आले.

बेस्ट उपक्रमातील बसताफा

- स्वमालकीच्या - १०९५

- भाडेतत्त्वावरील - २००५

- एकूण - ३,१००

कोरोनापासून बंद झालेले बसमार्ग

१ मर्यादित, सी ११, १६ मर्यादित, २० मर्यादित, ३० मर्यादित, ४१, ए-४१, ४३, सी-४४, ४८, ६१, ६८, ७४, ७६, ८१ मर्यादित, ९३ मर्यादित, ९९, ए-१०१, ए-१०७, ए-१०९, ए-११४, १३०, १३३, १५६, १५७, १६१, १६६, ए-१७०, १७३, १८२, २१३, २१६, २२९, २५८, २६०, २८४, ए-२९५, ३०६ मर्यादित, ३०९ मर्यादित, ३२९, ३५३, ३५८, ए-३६६, ३८४, ३८८ मर्यादित, ४०८, ४२९, ४४८ मर्या, ४४९ मर्या, ४५८ मर्या, ४८७ मर्या, ४९१ मर्या, ५०६ मर्यादित, ६३०, ६३१, ६३२, ६४०, ६७७, ६७८, ७१२ मर्यादित, ७२० मर्यादित.

अंधेरी गोखले पुलामुळे बंद बस मार्ग : २९० मर्यादित, ३२४, ३२८, ३३६.

logo
marathi.freepressjournal.in