Mumbai : दादरमध्ये BEST चा अपघात; दुचाकीस्वाराचा मृत्यू, सहा जखमी, एक गंभीर

दादर प्लाझा येथील वीर कोतवाल उद्यानाजवळ सोमवारी सकाळी बेस्ट बसचा भीषण अपघात झाला.
Mumbai : दादरमध्ये BEST चा अपघात; दुचाकीस्वाराचा मृत्यू, सहा जखमी, एक गंभीर
Mumbai : दादरमध्ये BEST चा अपघात; दुचाकीस्वाराचा मृत्यू, सहा जखमी, एक गंभीर(Photo- X)
Published on

मुंबई : दादर प्लाझा येथील वीर कोतवाल उद्यानाजवळ सोमवारी सकाळी बेस्ट बसचा भीषण अपघात झाला. बसचालकाचा पाय ब्रेकवर न जाता एक्सिलेटरवर ठेवला गेल्याने नियंत्रण सुटून बसने सिग्नलवर उभ्या असलेल्या दुचाकी, चारचाकी वाहनांना जोरदार धडक दिली. या घटनेत दुचाकीस्वार नियाज अहमद (२८) या तरुणाचा जागीच मृत्यू झाला, तर सहा जण जखमी झाले असून वृषभ गुप्ता (२२) हा गंभीर जखमी झाला आहे.

काळाकिल्ला आगारातील मे. इव्हेट्रान्स (ओलेक्ट्रा) कंपनीची बस क्र. ७११ (मार्ग क्र. ४६३. अनुक्रमांक ३१) ही धारावी आगारातून वीर कोतवाल उद्यान (प्लाझा) दरम्यान धावत होती. सकाळी साधारण ९.३० वाजता ही बस वीर कोतवाल उद्यान (प्लाझा) येथून धारावी आगाराकडे परत जात असताना सिग्नलजवळ उभ्या असलेल्या एका क्रेनला व एका टॅक्सीला जाऊन धडकली.

या अपघातात दोन दुचाकीस्वार गंभीर जखमी झाले. त्यापैकी एका दुचाकीस्वाराचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून दुसऱ्यावर सायन रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. अपघातावेळी बसमधील दोन प्रवासी बस निरीक्षक आणि बस वाहक (कंडक्टर) यांनाही दुखापत झाली असून त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले.

अपघातात दोन दुचाकी, एक टॅक्सी आणि एक खासगी वाहनाचेही नुकसान झाले. घटनेची माहिती मिळताच वरळी येथील सहाय्यक आगार व्यवस्थापक, अपघात विभागाचे अधिकारी आणि पर्यवेक्षक कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. तसेच जखमींना तातडीने वैद्यकीय मदत मिळावी यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात आल्याचे बेस्ट उपक्रमाकडून सांगण्यात आले.

बस चालक विकास पडवे हे २०२० पासून ओलेक्टा वेटलीज ऑपरेटरकडे कार्यरत असून मार्च २०२१ पासून इलेक्ट्रिक बस चालवत आहेत. बेस्ट प्रशासनाच्या माहितीनुसार, चालकाला अशा प्रकारच्या बस चालविण्याचा अनुभव असून सुरक्षित वाहनचालनाबाबत त्यांना प्रशिक्षणही देण्यात आले होते. दरम्यान, आपण अधिक गंभीर अपघात होऊ नये म्हणून मुद्दामच उजवीकडे नेऊन बॅरिकेड्सना बस धडकवली असा दावा चालकाने केला आहे.

तत्काळ अहवाल सादर करा!

या अपघाताचे गांभीर्य लक्षात घेता या प्रकरणाची सखोल चौकशी करून तत्काळ अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. दरम्यान, या अपघाताची चौकशी करण्यासाठी बेस्ट उपक्रमातील चार वरिष्ठ अधिकाऱ्यांची चौकशी समिती स्थापन करण्यात आल्याचे बेस्ट उपक्रमाकडून सांगण्यात आले.

अपघातात मृत्यू व जखमी

  • नियाज अहमद (२८) मृत्यू

  • अमित म्हात्रे (४१), पादचारी, प्रकृती स्थिर

  • ऋषभ गुप्ता (२२), दुचाकीस्वार - प्रकृती गंभीर

  • महेश डोईफोडे (५०), बेस्ट निरीक्षक, प्रकृती स्थिर

  • विकास पडारे (४२), बेस्ट बसचालक, प्रकृती गंभीर

  • राजेंद्र पालेकर (५७), बेस्ट बस कंडक्टर, प्रकृती स्थिर

  • सतीश वाघमारे (४८), बेस्ट बस निरीक्षक, प्रकृती स्थिर

logo
marathi.freepressjournal.in