

मुंबई : बेस्टच्या ताफ्यातील वेट लीजच्या बसच्या अपघातात दिवसेंदिवस वाढ होत आहे. दिंडोशी बस आगारातील वेट लीजच्या बसचा गोरेगाव पूर्व येथील ओबेरॉय मॉल सिग्नलजवळ सोमवारी सायंकाळी विचित्र अपघात झाला. या अपघातात दोघेजण जखमी झाले आहेत.
भाईंदर पूर्वेला जाणाऱ्या भाडेतत्त्वावरील बसचा मागील भाग कारला घासला आणि चालकाचा बसवरील ताबा सुटला अन् ती मेट्रोच्या खांबाला जाऊन आदळली. या घटनेत राजेंद्र मुरलीधर सोनवणे (५८) आणि प्रवासी मंगेश रामचंद्र मोडळेकर (५७) जखमी झाले. तर बसचालकाविरोधात वनराई पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याचे बेस्ट उपक्रमाकडून सांगण्यात आले.
दिंडोशी आगारातील मातेश्वरी उपक्रमाची मार्ग क्रमांक ७०५/३६ वरील बस (एमएच-०१-डीआर-४२९५) दिंडोशी आगारातून भाईंदर पूर्वकडे जात होती. सोमवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास ओबेरॉय मॉलसमोरील उड्डाणपुलाखालील सिग्नलजवळ बस उजवीकडे वळत असताना तिचा मागील उजवा भाग एका खासगी कारला (एमएच-४७-बीपी-६४८३) घासला. त्यानंतर बसवरील नियंत्रण सुटल्याने ती मेट्रो रेल्वेच्या खांबावर जाऊन आदळली. या अपघातात दोनजण जखमी झाले. सोनवणे यांच्या डोक्याला दुखापत होऊन तीन टाके घालण्यात आले. तर मोडळेकर यांच्या हनुवटी व डोक्याला दुखापत झाली असून हनुवटीला एक आणि डोक्याला पाच टाके घालण्यात आले.
अपघातानंतर बेस्टच्या अपघात विभागाने दोन्ही जखमींना तातडीने जोगेश्वरी पूर्व येथील ट्रॉमा केअर रुग्णालयात दाखल केले. तसेच अपघातग्रस्त बस टोईंग वाहनाच्या मदतीने वनराई पोलीस ठाण्यात नेण्यात आली.
खासगी कार चालकाच्या तक्रारीवरून वनराई पोलिसांनी बस चालकाविरोधात टीएआर-४७८/२०२६ अन्वये गुन्हा नोंदविला आहे. दरम्यान, रात्री उशिरापर्यंत उपचारानंतर दोन्ही जखमींना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले असून दोघांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती बेस्ट प्रशासनाने दिली.