Mumbai : ‘बेस्ट’ची दुप्पट दरवाढ; ३१ लाख प्रवाशांना झटका, BMC प्रशासनाची मंजुरी, मोजावे लागणार 'इतके' पैसे

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमुळे लांबलेली ‘बेस्ट’ बसेसची दरवाढ अखेर जाहीर करण्यात आली आहे. स्वस्त व आरामदायी प्रवास म्हणून ओळख असलेल्या ‘बेस्ट’ बसचा प्रवास अखेर दुपटीने महागणार आहे.
Mumbai : ‘बेस्ट’ची दुप्पट दरवाढ; ३१ लाख प्रवाशांना झटका, BMC प्रशासनाची मंजुरी, मोजावे लागणार 'इतके' पैसे
Published on

मुंबई : लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमुळे लांबलेली ‘बेस्ट’ बसेसची दरवाढ अखेर जाहीर करण्यात आली आहे. स्वस्त व आरामदायी प्रवास म्हणून ओळख असलेल्या ‘बेस्ट’ बसचा प्रवास अखेर दुपटीने महागणार आहे. बेस्ट बसच्या तिकीट दरात वाढ करण्यास मुंबई महापालिका प्रशासनाने मंजुरी दिल्याचे पालिका आयुक्त डॉ. भूषण गगराणी यांनी सांगितले. आता ५ रुपयांना मिळणारे तिकीट १० रुपये, तर एसी बसचे ६ रुपयांचे तिकीट थेट १२ रुपये इतके होणार आहे, तर मासिक पासात तब्बल ३५० रुपयांची वाढ होणार आहे. वाढत्या महागाईमुळे आधीच सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले असताना, ३१.५ लाख प्रवाशांच्या खिशाला बेस्टने ‘दरवाढीची फोडणी’ दिली आहे.

गेल्या काही वर्षांत बेस्ट उपक्रमाला उतरती कळा लागली असून आर्थिक कोंडी दिवसेंदिवस वाढतच आहे. हे दुष्टचक्र रोखण्यासाठी बेस्ट उपक्रमाने तिकीट दरवाढीचा प्रस्ताव तयार केला होता. मात्र, राजकीय विरोधानंतर तिकीट दरवाढीचा प्रस्ताव गुंडाळण्यात आला होता. त्यामुळे बेस्ट उपक्रमाचा आर्थिक गाडा हाकण्यासाठी बेस्ट उपक्रमाने मुंबई महापालिका प्रशासनाकडे आर्थिक मदतीची मागणी केली आणि मुंबई महापालिका प्रशासनाने गेल्या १० वर्षांत ११ हजार कोटी रुपये बेस्ट उपक्रमाला मदतीपोटी दिले. तरीही बेस्ट उपक्रमाची आर्थिक कोंडी फुटत नसल्याने आणखी पैशांची मागणी बेस्ट उपक्रमाने मुंबई महापालिका प्रशासनाकडे केली. मात्र, मुंबई महापालिकेचीच आर्थिक घडी विस्कटल्याने पालिका प्रशासनाने हात वर केले. आता मुंबई महापालिका प्रशासनाने बेस्ट उपक्रमाला तिकीट दरवाढ करण्यास मंजुरी दिली आहे. पालिका प्रशासनाच्या मंजुरीनंतर वाहतूक विभाग व नगरविकास विभाग या दोघांची मंजुरी मिळताच तिकीट दरवाढ लागू करण्यात येणार आहे. पुढील एक ते दोन दिवसांत वाहतूक विभाग व नगर विकास विभागाची मंजुरी मिळणे अपेक्षित असल्याचे बेस्ट उपक्रमाकडून सांगण्यात आले.

विनावातानुकूलित मासिक बसपास

-५ किमी.साठी ४५० रुपये होता, तो आता ८०० रुपये.

-१० किमी.साठी १,००० रुपये होता, तो आता १,२५० रुपये.

-१५ किमी.साठी १,६५० रुपये होता, तो आता १,७०० रुपये.

-२० किमी.साठी २,२०० रुपये होता, तो आता २,६०० रुपये.

वातानुकूलित मासिक बसपास

-५ किमी.साठी ६०० रुपये होता, तो आता १,१०० रुपये.

-१० किमी.साठी १,४०० रुपये होता, तो आता १,७०० रुपये.

-१५ किमी.साठी २,१०० रुपये होता, तो आता २,३०० रुपये.

-२० किमी.साठी २,७०० रुपये होता, तो आता ३,५०० रुपये.

साप्ताहिक बसपास

-५ किमी.साठी ७० रुपये होता, तो आता १४० रुपये

-१० किमी.साठी १७५ रुपये होता, तो आता २१० रुपये

-१५ किमी.साठी २६५ रुपये होता, तो आता २८० रुपये

-२० किमी.साठी ३५० रुपये होता, तो आता ४२० रुपये

logo
marathi.freepressjournal.in