
मुंबई : आर्थिक कोंडी फोडण्यासाठी बेस्ट परिवहन विभागाला तिकीट दरात वाढ करण्यास मुंबई महापालिका प्रशासनाने मंजुरी दिली. त्यानंतर आता ‘रिजनल ट्रॅफिक ऑथोरेटी’ने अप्रत्यक्ष तिकीट दरवाढीला मंजुरी दिल्याने पुढील आठवड्यापासून प्रवाशांना तिकीट दरवाढीला सामोरे जावे लागणार आहे.
बेस्ट बसच्या तिकीट दरात वाढ करण्यास मुंबई महापालिका प्रशासनाने मंजुरी दिल्यानंतर अंतिम मंजुरीसाठी हा प्रस्ताव ‘रिजनल ट्रॅफिक ऑथोरेटी’कडे सादर करण्यात आला असता बुधवारी मंत्रालयात ‘रिजनल ट्रॅफिक ऑथोरेटी’ आणि बेस्ट उपक्रमाची बैठक पार पडली. या बैठकीत बेस्ट बसेसच्या तिकीट दरात वाढ करण्यावर सकारात्मक चर्चा झाली. या बैठकीचे ‘मिनिट्स’ बनवण्यासाठी एक ते दोन दिवसांचा कालावधी लागणार असल्याने बुधवारी ‘रिजनल ट्रॅफिक ऑथोरेटी’ने तिकीट दरवाढीच्या प्रस्तावावर स्वाक्षरी केली नाही. परंतु, पुढील एक ते दोन दिवसांत ते बेस्ट बस तिकीट दरवाढीच्या प्रस्तावावर स्वाक्षरी करणार असल्याचे सांगण्यात आले. त्यांची स्वाक्षरी झाल्यानंतर तिकीट मशीनमध्ये काहीसा बदल करणे, कॉम्प्युटरवर अपडेट करणे बाकी आहे. त्यामुळे सोमवार, ५ मेनंतर प्रवाशांना तिकीट दरवाढीचा भुर्दंड सहन करावा लागणार आहे.