

मुंबई : जोगेश्वरी येथील मजास डेपो परिसरातील ‘पीएमजी’ कॉलनी येथे ‘बेस्ट’च्या भाडेतत्त्वावरील बसने कोंबड्या वाहून नेणाऱ्या टेम्पोला धडक दिली. या घटनेत फरीद अहमद शेख (५३) या कोंबडी विक्रेत्याचा मृत्यू झाला असून बेस्ट बसचालकाविरोधात संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मजास डेपो परिसरातील पीएमजी कॉलनी येथे बेस्टच्या बसने टेम्पोतून कोंबड्या उतरविण्याचे काम सुरू असताना बुधवारी रात्री १०.१५ च्या सुमारास धडक दिली. या दुर्घटनेत फरीद अहमद शेख जबर जखमी झाले. त्यांना उपचारांसाठी जोगेश्वरी येथील ‘एचबीटी’ रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी बसचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
टेम्पोचा दरवाजा अचानक उघडल्याने अपघात
हाती आलेल्या माहितीनुसार, २१ ऑक्टोबर रोजी सकाळी मजास डेपो येथून अंधेरीच्या दिशेने बेस्टची मार्ग क्रमांक ४४१/३१ वरील बस जात होती. ही बस पीएमजी कॉलनी परिसरातून निघाली असताना रस्त्याच्या डाव्या बाजूला कोंबड्या वाहून नेणारा टेम्पो उभा होता. टेम्पोतून जवळच्या दुकानात कोंबड्या उतरविण्याचे काम सुरू होते. यावेळी टेम्पोच्या बाजूने बस जात असताना टेम्पोचा मागील दरवाजा अचानक उघडला. हा दरवाजा बसच्या मागील डाव्या कोपऱ्याला लागून परत फिरला आणि कोंबड्या उतरविणाऱ्या फरीद शेख यांना धडकला. त्यामुळे ते खाली पडून जखमी झाले. त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
आरटीओ तपासणीसाठी बस मजास डेपोत
दरम्यान, अपघाताची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी दोन्ही वाहने एमआयडीसी पोलीस ठाण्यात नेली. रात्री उशिरा जखमीचा मृत्यू झाल्याची माहिती बसचालकाला देण्यात आली. या प्रकरणी मोटार वाहन कायद्याच्या कलमान्वये बसचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बस आरटीओ तपासणीसाठी मजास डेपोमध्ये ठेवण्यात आली असून, पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.