मुंबई : बेस्ट उपक्रमाच्या ताफ्यात नवीन बसेस दाखल होत असल्याने बंद पडलेले बस मार्ग सुरू करण्याचा निर्णय बेस्ट उपक्रमाने घेतला आहे. कोरोना काळात बंद पडलेला बस मार्ग १३२ पुन्हा एकदा चार वर्षांनंतर प्रवासी सेवेत सुरु केला आहे. ही बस सेवा आता वातानुकूलित झाल्याने कुलाबा ते मुंबई सेंट्रल स्थानकादरम्यान प्रवाशांना गारेगार प्रवास करता येणार आहे.
सध्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आदर्श आचारसंहिता लागू असल्याने नवीन बस मार्ग सुरू करणे शक्य नाही.
परंतु बसेसची वाढती संख्या लक्षात घेता बंद पडलेले बस मार्ग सुरू करण्याचा निर्णय बेस्ट उपक्रमाने घेतला आहे. प्रवाशांच्या मागणीनुसार बस मार्ग क्रमांक १३२ सुरू केला असून या बस मार्गावरील बस कुलाबा बस स्थानक ते मुंबई सेंट्रल आगार या दरम्यान धावणार आहे. ही बस कुलाबा बस स्थानक, इलेक्ट्रिक हाऊस, डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी चौक, हुतात्मा चौक, अहिल्याबाई होळकर चौक, मरीन लाईन स्थानक, ऑगस्ट क्रांती मैदान, गोदरेज चौक, ब्रीच कँडी हॉस्पिटल, महालक्ष्मी मंदिर, हाजीअली, पासपोर्ट कार्यालय, वसंतराव नाईक चौक ताडदेव, मुंबई सेंट्रल स्थानक ते मुंबई सेंट्रल आगार दरम्यान चालवण्यात येणार आहेत.