

मुंबई : बेस्ट उपक्रमाच्या ताफ्यातील भाडेतत्त्वावरील बसेस प्रवाशांना सेवा देत आहेत. मात्र बेस्ट उपक्रमाच्याच अभियांत्रिकी विभागाने केलेल्या तपासणीत या बसेस तांत्रिकदृष्ट्या नादुरुस्त व धोकादायक असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. यामुळे प्रवाशांची सुरक्षा धोक्यात असल्याचे आरोप उबाठाचे शिवसेनेचे नगरसेवक बेस्ट समिती सदस्य डॉ. नितिन नांदगावकर यांनी केला आहे. दरम्यान, कंत्राटी बसेसचे सुरक्षा परीक्षण करावे, दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी बेस्ट उपक्रमाच्या महाव्यवस्थापकांकडे केल्याचे त्यांनी सांगितले.
मुंबईतील बेस्ट उपक्रमांतर्गत चालणाऱ्या कंत्राटी बस सेवा संदर्भात अत्यंत गंभीर व धोकादायक प्रकार उघडकीस आले असून, प्रवाशांच्या सुरक्षिततेबाबत मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. या कंत्राटी बसेस संबंधित आगारातील अभियांत्रिकी विभागामार्फत तपासण्यात येतात. तांत्रिक नादुरुस्त व धोकादायक बसेस प्रत्यक्षात प्रवासी सेवेसाठी रस्त्यावर चालविल्या जात असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. अभियांत्रिकी विभागाकडून बसमध्ये आढळलेल्या गंभीर त्रुटींबाबत लेखी सूचना देण्यात आल्या आहेत. तरी त्याची 'दुरुस्ती पूर्ण' झाल्याचे दर्शवून बसेस पुन्हा सेवेत दाखल केल्या जात आहेत. विशेषतः ब्रेक प्रणाली, स्टिअरिंग यंत्रणा यांसारख्या अत्यंत महत्त्वाच्या भागांमध्ये बिघाड आढळून आलेले असतानाही दुर्लक्ष केले जात आहे, असेही त्यांनी पत्रात नमूद केले आहे.
नादुरुस्त व धोकादायक बसेस चालविण्यासाठी चालकांवर दबाव टाकण्यात येत असल्याचेही निदर्शनास आले आहे. या सर्व प्रकारांमुळे अपघात होण्याची, प्रवाशांच्या जीवितास धोका निर्माण होण्याची तसेच मोठ्या प्रमाणावर वित्तहानी होण्याची गंभीर शक्यता आहे. हा प्रकार मोटार वाहन अधिनियम व प्रवासी सुरक्षा नियमांचे सरळ उल्लंघन असून, सार्वजनिक सुरक्षेशी खेळ करणारा आहे, असा आरोप त्यांनी केला आहे.
ही बाब अत्यंत गंभीर असून, प्रशासनाने तातडीने कठोर पावले उचलली नाहीत तर भविष्यात घडणाऱ्या कोणत्याही दुर्घटनेत संबंधित प्रशासन व कंत्राटदार पूर्णतः जबाबदार राहतील, असा इशाराही देण्यात आला आहे.
याची अंमलबजावणी करा
या प्रकरणांची उच्चस्तरीय व स्वतंत्र चौकशी करण्यात यावी.
दोषी कंत्राटदार व संबंधित अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात यावी.
सर्व आगारातील कंत्राटी बसेसचे तत्काळ सुरक्षा परीक्षण करावे.
अभियांत्रिकी विभागाच्या लेखी परवानगीशिवाय कोणतीही बस रस्त्यावर चालवू नये.
भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी कडक नियंत्रण यंत्रणा कार्यान्वित करण्यात यावी.