निवडणुकीनंतर बेस्ट बस सेवा ठप्प होणार? कंत्राटी कामगारांचा पुन्हा संपाचा इशारा

कामाचे तास, समान काम समान वेतन या मागण्यांची पूर्तता करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले होते. मात्र...
निवडणुकीनंतर बेस्ट बस सेवा ठप्प होणार? कंत्राटी कामगारांचा पुन्हा संपाचा इशारा

मुंबई : कामाचे तास, समान काम समान वेतन या मागण्यांची पूर्तता करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले होते. मात्र मुख्यमंत्र्यांच्या आदेशाकडे दुर्लक्ष करत कंत्राटदार कामगारांच्या मागण्यांना वाटाण्याच्या अक्षता लावत आहेत. त्यामुळे बेस्ट उपक्रमातील कंत्राटी कामगारांनी आंदोलन करण्याचा निर्णय घेतला असून ४ जूननंतर काम बंद आंदोलन करणार असल्याची माहिती कंत्राटी कामगार रघुनाथ खजूरकर यांनी दिली. त्यामुळे ४ जूननंतर बेस्टची बससेवा ठप्प होण्याची शक्यता आहे.

बेस्ट परिवहन सेवेत कंत्राटी बस जास्त असून बेस्टच्या बसेस कमी आहेत. कंत्राटी बसवाहकांचे कामाचे तास व कामाची गुणवत्ता ही बेस्ट परिवहनच्या कायम कामगाराप्रमाणेच असताना वेतनात फरक का? आम्ही जिवंत वाहक आहोत की, अदृश्य वाहक आहोत. १७ हजारात घर चालते का? तुटपुंज्या पगारात मुंबईत राहणे शक्य आहे का, असा सवाल रघुनाथ खजूरकर यांनी उपस्थित केला आहे.

बेस्ट उपक्रमातील भाडेतत्त्वावरील बसेस कंत्राटदाराच्या माध्यमातून चालवण्यात येतात. प्रवाशांना अधिकाधिक सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी कंत्राटी चालक व वाहक रोज सेवा देतात. भाडेतत्त्वावरील बसेस चालवताना कंत्राटी कामगारांना योग्य तो मोबदला मिळत नाही. याबाबत कंत्राटदारास अनेकदा विचारणा केली, मात्र पोकळ आश्वासना पलीकडे काहीच नाही. भाडेतत्त्वावरील बसेस कंत्राटी पद्धतीवर चालवणारा कंत्राटदार मालामाल होत आहे. मात्र कंत्राटी कामगारांचे आर्थिक गणित बिघडले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रकरणी लक्ष घालूनही कंत्राटदार जर ऐकत नसतील, तर आंदोलन करण्याशिवाय पर्याय नाही, असेही ते म्हणाले.

logo
marathi.freepressjournal.in