

मुंबई : मुंबईत ठिकठिकाणी सिग्नल यंत्रणा बसवण्यात आली असून लाल सिग्नल लागताच वाहनचालक आपली गाडी उभी करतात. मात्र बेस्टच्या ताफ्यात दाखल भाडेतत्त्वावरील बसेसचे चालक सिग्नल तोडण्यात धन्यता मानतात. त्यामुळे गेल्या पाच वर्षांत सिग्नल तोडल्याची १,३६९ प्रकरण समोर आली आहेत. यात बेस्ट उपक्रमात कायमस्वरुपी २५१ चालकांनी तर वेट लीजच्या १,११८ चालकांनी सिग्नल तोडल्याची आकडेवारी बेस्ट उपक्रमाने दिली आहे.
गेल्या काही वर्षांत बेस्ट बसेसचा प्रवास जीवघेणा ठरत असून भाडेतत्त्वावरील बसेसचे अपघात मोठ्या प्रमाणावर होत आहेत.प्रवाशांच्या सुरक्षेची जबाबदारी असलेल्या बेस्ट उपक्रमातील चालकांकडूनच वाहतूक नियमांची पायमल्ली होत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.
सर्वाधिक प्रकरणे अंधेरीत नोंदली गेली असून १८८ कंत्राटी चालकांवर कारवाई करण्यात आली आहे. सांताक्रूझ (एसएनडी) आगारात १७५, देवनार (डीएनआर) येथे २११, तर माजास (एमजेएस) येथे ८० प्रकरणे नोंदली गेली आहेत. काही आगारांमध्ये चालकांना एक दिवस निलंबन, समज अशा शिक्षाही देण्यात आल्या आहेत.
पाच वर्षांत सिंगल जंपिंगची प्रकरणे
एकूण प्रकरणे - १,३६९
बेस्ट चालकांची प्रकरणे - २५१
वेट लीज चालकांची प्रकरणे - १,११८
शिस्तभंग कारवाई - २१२
कंत्राटी चालकांवरील इन्फ्रॅक्शन कारवाई : ९९५
कारवाईची भीती नाही?
जानेवारी २०२१ ते मे २०२६ या कालावधीत बेस्टच्या बस चालकांकडून सिग्नल जंपिंगची तब्बल १,३६९ प्रकरणे नोंदविण्यात आली आहेत. यापैकी २५१ प्रकरणे बेस्टच्या स्वतःच्या चालकांची, तर १,११८ प्रकरणे वेट लीज (कंत्राटी) चालकांची आहेत. या प्रकरणांमध्ये २१२ चालकांवर प्रत्यक्ष शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली असून ९९५ कंत्राटी चालकांवर आर्थिक दंड अथवा इन्फ्रॅक्शनची कारवाई करण्यात आली आहे. मात्र एवढ्या मोठ्या प्रमाणावर प्रकरणे उघडकीस येऊनही सिग्नल तोडण्याचे प्रकार सुरूच असल्याने कारवाईची भीतीच वेट लीज चालकांमध्ये राहिली नसल्याची चर्चा आहे.