‘बेस्ट’च्या बोनससाठी महापालिकेचे ८० कोटी; आता निवडणूक आयोगाच्या परवानगीची प्रतीक्षा

बेस्टच्या कामगार, कर्मचाऱ्यांना यंदाचा बोनस (सानुग्रह अनुदान) देण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने सुमारे ८० कोटी रुपयांची रक्कम सोमवारी (४ नोव्हेंबर) बेस्टच्या खात्यात जमा केली. पण बेस्टकडून ही रक्कम कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा करण्यासाठी आता केंद्रीय निवडणूक आयुक्तांची परवानगी मिळण्याची प्रतीक्षा केली जात आहे.
‘बेस्ट’च्या बोनससाठी महापालिकेचे ८० कोटी; आता निवडणूक आयोगाच्या परवानगीची प्रतीक्षा
Published on

मुंबई : बेस्टच्या कामगार, कर्मचाऱ्यांना यंदाचा बोनस (सानुग्रह अनुदान) देण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने सुमारे ८० कोटी रुपयांची रक्कम सोमवारी (४ नोव्हेंबर) बेस्टच्या खात्यात जमा केली. पण बेस्टकडून ही रक्कम कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा करण्यासाठी आता केंद्रीय निवडणूक आयुक्तांची परवानगी मिळण्याची प्रतीक्षा केली जात आहे.

यंदा भाऊबीज उलटून गेली, तरी बेस्ट कर्मचाऱ्यांच्या पदरात बोनसची भेट पडलेली नाही. मुंबई महानगरपालिकेच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना यंदा २९ हजार रुपये इतके सानुग्रह अनुदान दिवाळीच्या सुमारास अदा करण्यात आले आहे. विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्याच्या काही तास आधी महापालिका कर्मचाऱ्यांना सानुग्रह अनुदान देण्याची घोषणा पालिका प्रशासनाकडून करण्यात आली होती. पालिका आयुक्त भूषण गगराणी आणि पालिकेतील कर्मचारी संघटनांचे नेते यांच्यात सानुग्रह अनुदानाबाबत चर्चा झाली. त्यावेळी बेस्ट कर्मचाऱ्यांच्या सानुग्रह अनुदानावर चर्चा किंवा निर्णय झाला नव्हता. प्रथेप्रमाणे पालिका कर्मचाऱ्यांसोबतच बेस्ट कर्मचाऱ्यांना बोनस जाहीर होईल, अशा भ्रमात बेस्टमधील अधिकारी आणि कामगार संघटनांचे नेते राहिले. पण, दरम्यानच्या काळात निवडणुकीची आचारसंहिता जारी झाल्याने बेस्ट कर्मचाऱ्यांच्या बोनसचा प्रश्न अधांतरी राहिला. यामुळे बेस्टच्या कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली होती. त्यामुळे रविवारी आणि सोमवारी बेस्टमध्ये सामूहिक रजा आंदोलन झाले.

बेस्ट कामगार सेनेचे अध्यक्ष सुहास सामंत यांच्या पुढाकाराने बेस्टच्या सर्वच कर्मचारीवर्गास दिवाळी बोनस मिळावा म्हणून सातत्याने पालिका तसेच बेस्ट प्रशासनाशी गाठीभेटी, चर्चा सुरू होत्या. सोमवारी कुलाबा येथील बेस्ट भवनात कामगार संघटनांच्या प्रतिनिधींनी पुन्हा बेस्टचे महाव्यवस्थापक अनिल डिग्गीकर यांच्याशी चर्चा केली. त्यावेळी डिग्गीकर यांनी सांगितले की, बेस्ट कर्मचाऱ्यांच्या सानुग्रह अनुदानासाठी महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी आजच बेस्टच्या खात्यात ८० कोटी रुपये ऑनलाईन जमा केले आहेत.

बेस्टच्या कामगार, कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आमचा लढा सनदशीर मार्गाने सुरू आहे. या लढ्यात बेस्ट उपक्रमाच्या दैनंदिन सेवांवर आणि कारभारावर कोणताही विपरीत परिणाम होणार नाही, नागरिकांना दिवाळी सणाच्या काळात कोणताही त्रास होणार नाही, याची काळजी आम्ही घेतली. बेस्टची सेवा सुरू ठेवण्याची भूमिका घेतली. बोनससाठी पालिकेने निधी दिला असून आता महाव्यवस्थापक निवडणूक आयोगाच्या मंजुरीची वाट पाहत आहेत. - सुहास सामंत, अध्यक्ष, बेस्ट कामगार सेना.

logo
marathi.freepressjournal.in