बेस्ट कर्मचाऱ्यांचा बोनस दिवाळीनंतर? आचारसंहिता संपल्यानंतर खात्यावर जमा होणार रक्कम?

मुंबई महानगरपालिका व बेस्ट कर्मचाऱ्यांना गेल्या दोन वर्षापासून एकाच वेळी सानुग्रह अनुदान देण्याची घोषणा होत होती. पालिका कर्मचाऱ्यांना जेवढे सानुग्रह अनुदान जाहीर व्हायचे तेवढीच रक्कम बेस्ट कर्मचाऱ्यांनाही देण्यात येत होती.
BEST
BEST
Published on

मुंबई : बेस्ट कर्मचाऱ्यांना यंदाचा दिवाळी बोनस किंवा सानुग्रह अनुदान देण्याबाबत सोमवारी बैठक आयोजित केली जाणार आहे. सध्या विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता आहे. त्यामुळे आचारसंहिता संपल्यानंतरच बेस्ट कर्मचाऱ्यांना बोनसची रक्कम मिळेल, असे मानले जात आहे. त्यामुळे बेस्ट कर्मचाऱ्यांची दिवाळी बोनसविनाच जाणार आहे.

निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या विधानसभा निवडणुकीच्या कार्यक्रमानुसार निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण करण्याचा दिवस हा २५ नोव्हेंबर आहे. म्हणजे त्यानंतर बेस्ट कर्मचाऱ्यांच्या खात्यावर बोनसची रक्कम जमा होईल, असे सूत्रांनी सांगितले.

बेस्ट उपक्रमाची आर्थिक स्थिती सध्या नाजूक आहे. कर्मचाऱ्यांची तसेच बेस्टच्या स्वमालकीच्या बसगाड्यांची संख्याही कमी होत आहे. भाडेतत्वावरील बसगाड्यांचे ठेकेदारही बसेस बंद करीत आहेत. या पार्श्वभूमीवर आता बेस्ट कामगारांना यंदाचे सानुग्रह अनुदान मिळणार की नाही, अशी चर्चा सुरू होती.

मुंबई महानगरपालिका व बेस्ट कर्मचाऱ्यांना गेल्या दोन वर्षापासून एकाच वेळी सानुग्रह अनुदान देण्याची घोषणा होत होती. पालिका कर्मचाऱ्यांना जेवढे सानुग्रह अनुदान जाहीर व्हायचे तेवढीच रक्कम बेस्ट कर्मचाऱ्यांनाही देण्यात येत होती. पालिका कर्मचाऱ्यांना यंदा २९ हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय पालिका मुख्यालयात प्रशासन व कामगार नेत्यांच्या समन्वय समितीच्या बैठकीत जाहीर करण्यात आला. तेव्हा बेस्ट कर्मचाऱ्यांना सानुग्रह अनुदान देण्याचा विषयच निघाला नाही. बेस्ट महाव्यवस्थापकांनीही बेस्ट कर्मचाऱ्यांना सानुग्रह अनुदान देण्याचा प्रस्ताव पालिका आयुक्तांकडे दिला नाही. त्यामुळे बेस्ट कर्मचाऱ्यांना पालिका कर्मचाऱ्यांसोबत सानुग्रह अनुदान जाहीर झाले नाही, असे समजते.

सानुग्रह अनुदानासाठी ७० कोटींची तरतूद

पालिका आयुक्तांनी बेस्ट कर्मचाऱ्यांच्या सानुग्रह अनुदानासाठी ७० कोटीची तरतूद करून ठेवली आहे. सध्या विधानसभा निवडणूकीची आचारसंहिता असल्यामुळे बेस्ट कर्मचाऱ्यांना सानुग्रह अनुदान जाहीर करण्यात अडचण निर्माण झाली आहे. त्यामुळे बेस्ट कर्मचाऱ्यांना आचारसंहिता समाप्तीनंतरच सानुग्रह अनुदानाची रक्कम मिळेल, असे सूत्रांनी सांगितले.

logo
marathi.freepressjournal.in