मुंबईकरांच्या खिशाला झळ! आजपासून ‘बेस्ट’ प्रवास महाग, १० लाखांहून जास्त पासधारकांना आर्थिक फटका

स्वस्त व आरामदायी प्रवास म्हणून ओळख असलेल्या ‘बेस्ट’चा प्रवास शुक्रवारपासून महागला आहे.
मुंबईकरांच्या खिशाला झळ! आजपासून ‘बेस्ट’ प्रवास महाग, १० लाखांहून जास्त पासधारकांना आर्थिक फटका
Published on

मुंबई : स्वस्त व आरामदायी प्रवास म्हणून ओळख असलेल्या ‘बेस्ट’चा प्रवास शुक्रवारपासून महागला आहे. प्रवाशांच्या पसंतीस उतरलेल्या मासिक पासात तब्बल १५० रुपयांनी वाढ झाली असून ७५० ऐवजी ९०० रुपये मोजावे लागणार आहेत, तर दैनंदिन पास आता ५० रुपयांवरून ६० रुपये इतका झाला आहे. महागाई आग ओकत असताना, बेस्टने प्रवाशांच्या खिशाला फोडणी दिली आहे. ही दरवाढ शुक्रवार, १ मार्चपासून लागू होणार आहे.

सुरक्षित व आरामदायी प्रवास म्हणून प्रवासी आजही बेस्ट बसेसना पसंती देत आहेत. बेस्ट बसेसद्वारे दररोज ३५ लाख प्रवासी प्रवास करत असून मासिक पास काढून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी आहे. ही संख्या १० लाख ४० हजारांपर्यंत असून बस पास महागल्याने १० लाखांहून अधिक पासधारकांना त्याचा फटका बसणार आहे. ‘बेस्ट’ने पासमध्ये दरवाढ केली असली तरी दैनंदिन नियमित तिकीट दरामध्ये वाढ केलेली नाही. परंतु दैनंदिन आणि मासिक पासनुसार अमर्याद प्रवास, सर्व एसी बसमधून प्रवासाची सुविधा कायम असल्याचे ‘बेस्ट’ने स्पष्ट केले. या नव्या सुधारित दरांनुसार ४२ ऐवजी १८ बसपास करण्यात आले आहेत. बसपास सहा रुपये, १३ रुपये, १९ रुपये आणि २५ रुपयांपर्यंतच्या वातानुकूलित आणि विनावातानुकूलित प्रवासभाड्याच्या अनुषंगाने साप्ताहिक आणि मासिक स्वरूपात उपलब्ध करण्यात आले आहेत. विविध शैक्षणिक संस्थांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना २०० रुपयांचा मासिक बसपास उपलब्ध असून या बसपासच्या सहाय्याने अमर्याद बसफेऱ्यांची सुविधा कायम ठेवण्यात आलेली आहे.

१० लाखांहून अधिक प्रवाशांना झटका!

‘बेस्ट’ बस ही रेल्वेनंतर मुंबईची दुसरी लाइफलाईन समजली जाते. ‘बेस्ट’ बसने दररोज ३५ लाख प्रवासी प्रवास करतात. मात्र तोट्यात जाणाऱ्या ‘बेस्ट’चे उत्पन्न वाढवण्यासाठी, सुट्ट्या पैशांची कटकट संपवण्यासाठी ही सुधारित दररचना करण्यात आल्याचे समजते. त्यामुळे महसूल वाढवण्यासाठी आणि प्रवाशांना देण्यात येणाऱ्या पास सुविधेमध्ये सुसूत्रता आणण्यासाठी दर सुधारणा केल्याचे ‘बेस्ट’ प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. मात्र या दरवाढीमुळे पासधारक १० लाख ४० हजार ९६५ प्रवाशांना आर्थिक फटका बसणार आहे.

नव्या योजनेची वैशिष्ट्ये

ज्येष्ठ नागरिकांना मासिक बस पासमध्ये ५० रुपये सवलत कायम ठेवण्यात आली आहे. साप्ताहिक बसपासमध्ये मात्र कोणतीही सवलत नाही.

पालिका शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या गणवेशधारक विद्यार्थ्यांना तसेच ४० टक्के व त्यापेक्षा जास्त दिव्यांग प्रवाशांच्या मोफत प्रवासाच्या बसपासमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

बेस्ट उपक्रमाच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांसाठी असलेल्या ९०० रुपये आणि अधिस्विकृतीधारक पत्रकारांसाठी असलेल्या वार्षिक ३६५ रुपयांच्या बसपास दरामध्ये कोणताही बदल केलेला नाही.

साप्ताहिक पासनुसार ६ रुपयांपर्यंतच्या फेरीकरिता ७० रुपये, १३ रुपयांपर्यंतच्या बसफेरीसाठी १७५ रुपये, १९ रुपयांपर्यंत २६५ आणि २५ पर्यंतच्या फेऱ्यांसाठी ३५० रुपये.

logo
marathi.freepressjournal.in