

मुंबई : बेस्ट उपक्रमाने येत्या ५ ऑक्टोबरपासून बसप्रवर्तनात महत्त्वाचे बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. यात विविध बसमार्गांचे सुसूत्रीकरण मार्गविस्तार अतिरिक्त फेऱ्या तसेच सर्वसाधारण बसमार्गांचे वातानुकूलित बससेवेत रूपांतर करण्याचा निर्णय घेतला आहे.
ए-२२ , ए ३५ आणि ए ३९ या तीन बसमार्गाचे प्रवर्तन यापुढे ते मजास आगारऐवजी सीप्झ बस स्थानक येथेच समाप्त करण्यात येणार आहे. ए-३० या बसमार्गावरील बस रमाबाई नगर ते विक्रोळी आगारदरम्यान विक्रोळी रेल्वे स्थानक उड्डाणपुलामार्गे असलेले प्रवर्तन रद्द करून, रमाबाई नगर-घाटकोपर बसस्थानक-नित्यानंद नगर-श्रेयस सिनेमा जंक्शन-लालबहादूर शास्त्री मार्गे विक्रोळी आगार असा प्रवर्तित करण्यात येणार आहे.
बोरिवली, घाटकोपर बस सेवा बंद
प्रवाशांचा अत्यल्प प्रतिसाद मिळत असल्याने बोरिवली स्थानक पूर्व ते घाटकोपर आगार दरम्यान धावणाऱ्या ए-४७१ मार्गाचे प्रवर्तन पूर्णपणे रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
असे होणार बदल
ए-६२ मार्गाच्या प्रवर्तनात बदल करताना वत्सलाबाई देसाई चौक (हाजीअली) ते पंडित पलुस्कर चौक हा मार्ग रद्द करून, वत्सलाबाई देसाई चौक येथून मदन मोहन मालवीय मार्गे वसंतराव नाईक चौक (ताडदेव)पर्यंत सेवा करण्यात येणार आहे. यापुढे मार्ग वसंतराव नाईक चौक ते विद्याविहार बसस्थानक असा राहणार आहे.
ए-२०० या मार्गाचा वडाळा आगारापासून विस्तार करण्यात येणार असून, रफी अहमद किडवाई मार्ग, झकेरिया बंदर मार्ग आणि श्रीकांत केशव हडकर मार्गे श्रावण यशवंते चौक (काळाचौकी)पर्यंत बससेवा वाढविण्यात येणार आहे.
प्रवाशांची मागणी लक्षात घेऊन काही मार्गांवर अतिरिक्त बसफेऱ्या वाढविण्यात येणार आहेत. ए-४२ या मार्गावर सॅन्डहर्स्ट रेल्वे स्थानक ते गोल देऊळ दरम्यान सकाळी ८.३० ते रात्री ९ वाजेपर्यंत अतिरिक्त फेऱ्या चालवण्यात येतील.
ए-२४५ मार्गावर बोरीवली स्थानक (पश्चिम) ते गणपत पाटील नगरदरम्यान सकाळी ७ ते दुपारी १२ आणि संध्याकाळी ४.३० ते रात्री ९.३० या वेळेत अतिरिक्त फेऱ्या करण्यात येतील. ए-२७६ या मार्गावरही कांदिवली स्थानक (पश्चिम) ते चारकोप पोलीस ठाण्यादरम्यान सकाळी ७ ते दुपारी १२ आणि संध्याकाळी ४ ते रात्री ९ या वेळेत अतिरिक्त फेऱ्या चालवण्यात येणार आहेत.
बेस्ट प्रशासनाने काही सर्वसाधारण बसमार्गांचे वातानुकूलित बससेवेत रूपांतर करण्याचाही निर्णय घेतला असून यामध्ये १५३, २२३, २४२, २४९, २६६, ३१२, ४२३ आणि सी-५०५ या मार्गांचा समावेश आहे. या मार्गावरील बस आता वातानुकूलित सेवेत रूपांतर करण्यात येणार आहे.
याशिवाय ए-३१५ मार्गाच्या प्रवर्तनातही बदल करण्यात येणार आहे. गुरू तेगबहादूर नगर रेल्वे स्थानक आणि समाज मंदिर हॉलदरम्यानचे विद्यमान प्रवर्तन रद्द करून रावळी कॅम्प, कोकरी आगार, वडाळा रोड रेल्वे स्थानकमार्गे प्रतीक्षानगर आगारापर्यंत मार्गाचा विस्तार करण्यात येणार आहे.
घाटकोपर स्थानक पश्चिम येथून सुटणारे ए-४१९, ए-४२७ बसमार्ग आता घाटकोपर आगारातून सुटतील ए-४३३ या मार्गांच्या प्रवर्तनातही बदल प्रस्तावित करण्यात येणार असून घाटकोपर आगार येथून सुटणारी हि बस आता अंधेरी स्थानक पश्चिम जाता बर्फीवाला उड्डाणपुलावरून थेट जुहू विले पार्ले बस स्थानकापर्यंत धावेल.