

मुंबई : मुंबईकरांना आरामदायी प्रवासासाठी बेस्ट उपक्रमाच्या ताफ्यात तब्बल १,५०० वातानुकूलित इलेक्ट्रिक मिडी बसगाड्यांचा समावेश करण्यात येणार आहे. यासाठी गुरुवारी दोन बस पुरवठादार कंपन्यांसोबत करार करण्यात आला.
केंद्र सरकारच्या ‘पीएम ई-ड्राइव्ह’ योजनेंतर्गत या बस भाडेतत्त्वावर चालविण्यात येणार आहेत. मार्च २०२७ पर्यंत पहिल्या टप्प्यात २२५ बस मुंबईच्या रस्त्यांवर धावतील, तर उर्वरित बस मार्च २०२८ पर्यंत टप्प्याटप्प्याने दाखल होतील. एका चार्ज मध्ये २०० किमीचा पल्ला गाठणार आहे. मेट्रो स्थानकांपासून प्रवाशांना घरापर्यंत पोहोचविण्यासाठी या बसचा वापर केला जाणार आहे.
या करारानुसार, मुंबई विद्युत वाहन ऑपरेशन प्रा. लि. कंपनीकडून इका बनावटीच्या १,०५० बस, तर साईग्रीन ईव्हीएम प्रा. लि. कंपनीकडून स्विच बनावटीच्या ४५० बस उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.
२८ आसन क्षमता
नऊ मीटर लांबीच्या या बसमध्ये २८ प्रवाशांसाठी आसनव्यवस्था असून दिव्यांगांसाठी स्वतंत्र व्हीलचेअर जागा आणि स्वयंचलित रॅम्प असेल. एका चार्जमध्ये किमान २०० किलोमीटर धावण्याची क्षमता या बसमध्ये आहे. अग्निसुरक्षा यंत्रणा, ३६० अंश प्रत्येक आसनाजवळ यूएसबी चार्जिंगची सुविधाही उपलब्ध असेल.