

मुंबई : भुलेश्वर येथील मार्केट परिसरात एका दुकानात अग्निभडका उडाला. शाॅर्टसर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. मात्र या घटनेनंतर भुलेश्वर येथील बेस्ट उपक्रमाच्या विद्युत विभागाने जुन्या १९५० च्या दशकातील केबल्स बदलण्याचा निर्णय घेतला आहे.
भुलेश्वर परिसरात गुरुवारी सकाळी लागलेल्या भीषण आगीच्या पार्श्वभूमीवर वीजपुरवठा करणाऱ्या ‘बेस्ट’ उपक्रमाकडून शॉर्टसर्किटमुळे आग लागली का, याची चौकशी केली जात आहे. या परिसरातील जीर्ण झालेल्या वीजपुरवठा यंत्रणेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. त्यामुळे या भागात वीजेचा प्रश्न निर्माण होत आहे. तब्बल १९५० च्या दशकातील जुन्या वीजवाहिन्यांमुळे परिसरात वारंवार वीजपुरवठा खंडित होणे, व्होल्टेजमध्ये चढ-उतार होणे आणि विजेच्या ठिणग्या उडण्यासारख्या घटना घडत असल्याच्या तक्रारी स्थानिकांकडून करण्यात येत आहेत.
भुलेश्वर हा मुंबईतील दाट लोकवस्तीचा आणि मोठ्या प्रमाणावर व्यावसायिक आस्थापना असलेला परिसर आहे. त्यामुळे येथील वीजवितरण यंत्रणेवर मोठा ताण पडतो.
जुन्या भूमिगत केबल्स आणि वाढती विजेची मागणी यामुळे वीजपुरवठ्याच्या व्यवस्थेवर अतिरिक्त भार निर्माण होत असल्याचे सांगण्यात येत आहे. वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर पर्यायी स्वरूपात दिल्या जाणाऱ्या तात्पुरत्या जोडण्यांमुळेही वीजवाहिन्यांवरील भार वाढतो. परिणामी, जुन्या वीजवाहिन्या तापून त्यांना आग लागण्याचा धोका निर्माण होतो, असे बेस्टच्या वीजपुरवठा विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.