Mumbai: भगवती रुग्णालयाचा कारभार खासगी संस्थेकडे; ४९० खाटांसाठी निविदा प्रक्रिया, ५० टक्के खाटा पालिका रुग्णांसाठी राखीव

बोरिवली पश्चिम येथील श्री हरीलाल भगवती रुग्णालयाची पुनर्रचना करून उभारण्यात आलेले ४९० खाटांचे अत्याधुनिक मल्टी-स्पेशालिटी रुग्णालय आता सार्वजनिक-खासगी भागीदारी (पीपीपी) तत्त्वावर चालविण्यात येणार आहे. या रुग्णालयाच्या संचालनासाठी मुंबई महानगरपालिकेने ३० वर्षांच्या करारासाठी निविदा प्रक्रिया सुरू केली आहे.
Mumbai: भगवती रुग्णालयाचा कारभार खासगी संस्थेकडे; ४९० खाटांसाठी निविदा प्रक्रिया, ५० टक्के खाटा पालिका रुग्णांसाठी राखीव
Mumbai: भगवती रुग्णालयाचा कारभार खासगी संस्थेकडे; ४९० खाटांसाठी निविदा प्रक्रिया, ५० टक्के खाटा पालिका रुग्णांसाठी राखीवसंग्रहित छायाचित्र
Published on: 

मुंबई : बोरिवली पश्चिम येथील श्री हरीलाल भगवती रुग्णालयाची पुनर्रचना करून उभारण्यात आलेले ४९० खाटांचे अत्याधुनिक मल्टी-स्पेशालिटी रुग्णालय आता सार्वजनिक-खासगी भागीदारी (पीपीपी) तत्त्वावर चालविण्यात येणार आहे. या रुग्णालयाच्या संचालनासाठी मुंबई महानगरपालिकेने ३० वर्षांच्या करारासाठी निविदा प्रक्रिया सुरू केली आहे. रुग्णालयातील एकूण खाटांपैकी ५० टक्के खाटा पालिकेच्या रुग्णांसाठी आणि सरकारी आरोग्य योजनांच्या लाभार्थ्यांसाठी राखीव ठेवण्यात येणार आहेत. खासगी भागीदाराकडून किमान १५० कोटी रुपयांची गुंतवणूक अपेक्षित असून पालिकेला दरवर्षी किमान ६.५६ कोटी रुपये भाडे मिळणार आहे.

भगवती रुग्णालयात ९० अतिदक्षता विभागातील (आयसीयू) खाटा, नऊ आधुनिक ऑपरेशन थिएटर्स, कॅथ लॅब, एमआरआय आणि सीटी स्कॅन यांसारख्या सुविधा उपलब्ध करून देण्याची तरतूद आहे. रुग्णालयाचा दर्जा आधुनिक वैद्यकीय मानकांनुसार राखतानाच पालिकेच्या तिजोरीवर अतिरिक्त आर्थिक भार पडू नये, या उद्देशाने पीपीपी मॉडेलचा अवलंब करण्यात येत असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

सर्वांना समान दर्जाच्या उपचारांची सुविधा

सर्वसामान्य व आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांना उपचार मिळावेत, यासाठी रुग्णालयातील किमान ५० टक्के खाटा पालिका रुग्ण तसेच महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व आयुष्मान भारत यांसारख्या सरकारी आरोग्य योजनांच्या लाभार्थ्यांसाठी राखीव ठेवण्यात येणार आहेत. पालिकेचे व खासगी रुग्ण असा भेदभाव न करता सर्वांना समान दर्जाच्या उपचारांची सुविधा देण्याची तरतूद करण्यात आली आहे.

देखरेखीसाठी विशेष अधिकारी; नियमभंग केल्यास कारवाई

रुग्णालयाच्या कामकाजावर नियंत्रण ठेवण्यासाठी पालिका आयुक्तांकडून विशेष कार्य अधिकारी (ओएसडी) नियुक्त केला जाणार आहे. रुग्णालय व्यवस्थापन प्रणालीतील (एचएमआयएस) माहितीचा या अधिकाऱ्याला प्रवेश असेल. त्यामुळे रुग्णांवरील उपचार, खाटांची उपलब्धता आणि बिलांची तपासणी करणे शक्य होणार आहे. रुग्णांच्या तक्रारींचे १५ दिवसांच्या आत निवारण करण्यासाठी स्वतंत्र तक्रार निवारण कक्षही कार्यरत ठेवण्याची तरतूद आहे. करारातील अटींचे उल्लंघन झाल्यास दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in