

मुंबई : भांडुप पश्चिमेकडील गुजराती हिंदू स्मशानभूमीचा विकास करण्यासाठी ९० लाख रुपये भरण्यापासून दिलासा मिळाला आहे. महापौर रितू तावडे यांनी ९० लाख रुपये भरण्याची अट रद्द करण्याचे निर्देश पालिका प्रशासनाला दिले आहेत.
भांडुप (पश्चिम) येथील गुजराती हिंदू स्मशानभूमीच्या समस्या तातडीने मार्गी लावाव्यात.स्थानिक नागरिकांच्या मागणीचा विचार करून वायू प्रदूषण कमी करण्यासाठी महानगरपालिका निधीतून पर्यावरणपूरक धुराची उंच चिमणी उभारावी, असे निर्देश महापौर रितू तावडे यांनी दिले. स्मशानभूमीतील मूलभूत सुविधा, स्वच्छता आणि पर्यावरणविषयक बाबींकडे विशेष लक्ष देऊन नागरिकांच्या तक्रारींचे वेळेत निराकरण करावे, असे निर्देश महापौर तावडे यांनी दिले.
महापौर रितू तावडे यांच्या अध्यक्षतेखाली आणि माजी खासदार मनोज कोटक यांच्या पुढाकाराने एस आणि टी विभागातील विविध विषयांवरील बैठक पार पडली. अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) प्राजक्ता वर्मा लवंगारे, उप आयुक्त (उद्याने) अजितकुमार आंबी, एस विभागाच्या सहायक आयुक्त समरीन सय्यद, टी विभागाच्या सहायक आयुक्त योगिता कोल्हे यांच्यासह अधिकारी, अभियंते उपस्थित होते.
स्मशानभूमीची जागा दान मिळाली
भांडुप (पश्चिम) येथील गुजराती हिंदू स्मशानभूमीसाठी संबंधित संस्थेने सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून मौल्यवान जागा दान स्वरूपात उपलब्ध करून दिली आहे. या जागेचा उपयोग नागरिकांच्या हितासाठी होत आहे. या स्मशानभूमीच्या विकासासाठी महापालिकेने २ कोटी ७० लाखांचे अंदाजपत्रक तयार केले आहे. तथापि, एका परिपत्रकाचा आधार घेऊन २ कोटी ७० लाख रुपयांच्या अंदाजपत्रकीय रकमेपैकी संबंधित संस्थेने एक तृतीयांश म्हणजेच ९० लाख रूपये खर्च करावेत, असे बजावले आहे.
परमवीर चक्र उद्यानाचे लोकार्पण करा!
सामाजिक दायीत्व निधीतून टी विभागात मुलुंड पश्चिम येथे परमवीर चक्र उद्यान विकसित करण्यात आले आहे. त्याचे लोकार्पण लवकरात लवकर करावे. उद्यानाच्या देखभाल-दुरुस्तीसाठी काळजीवाहक संस्थेची नेमणूक करावी. त्या माध्यमातून उद्यानाचे परिरक्षण, सुरक्षा व्यवस्था तैनात करावी, असेदेखील निर्देश महापौर तावडे यांनी दिले.
सुधारित परिपत्रक जारी करा!
सेवाभावी वृत्तीने आणि ना नफा ना तोटा तत्त्वावर संस्था कार्यरत आहे.स्थानिक नागरिकांच्या तक्रारींचे दखल घेऊन स्मशानभूमीतील मूलभूत सुविधा, स्वच्छता याकडे विशेष लक्ष द्यावे. अंदाजपत्रकीय रकमेपैकी संबंधित संस्थांनी एक तृतीयांश रक्कम भरावी, याबाबत जुलै २०२६ मध्ये निर्गमित केलेले परिपत्रक तातडीने रद्द करावे आणि सुधारित परिपत्रक जारी करावे, असे निर्देश महापौर रितू तावडे यांनी दिले.