

मुंबई : पावसाळ्यात पडझडीचे सत्र सुरू असून शनिवारी भांडुप पश्चिम येथील लालबहादूर शास्त्री मार्गावर एशियन पेंट्स कंपनीसमोर सुमारे १०० बाय १०० फुटांचा रस्त्याचा भाग अचानक खचल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. या दुर्घटनेत एक टेम्पो खड्ड्यात पडला. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
घटनेची माहिती मिळताच बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या एस विभागाच्या अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत परिसराला बॅरिकेड्स लावून परिसर सुरक्षित केला. खबरदारीचा उपाय म्हणून या मार्गावरील वाहतूक वळविण्यात आली असून, रस्ता सुरक्षित करण्याचे आणि दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे.
रस्ता नेमका कोणत्या कारणामुळे खचला याची चौकशी सुरू असून, सुरू असलेले उत्खनन आणि गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जमिनीची पकड कमकुवत झाल्याने ही घटना घडल्याचा प्राथमिक अंदाज अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
पायलिंगच्या कामामुळे दुर्घटना ?
रस्त्याशेजारी इमारतीचे बांधकाम सुरु असून पायलिंगच्या कामामुळे ही दुर्घटना घडली, असा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. या घटनेची मुंबई महापालिकेच्या रस्ते विभागाकडून तपासणी करण्यात येणार आहे. यावेळी आसपासची काही झाडेही कोसळली. रस्त्याचा पृष्ठभाग खचताच तेथे उभा असलेला टेम्पो थेट खड्यात घसरला.