मुंबई: विधानसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. निवडून येण्यासाठी उमेदवारांनी प्रचाराचा धडाका लावला आहे. मात्र प्रचारा दरम्यान अज्ञात व्यक्तींनी हल्ला करण्याचा प्रयत्न केला असून माझ्या जीवाला धोका असल्याची तक्रार मुलुंड विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे भाजपचे उमेदवार मिहिर कोटेचा यांनी राज्य निवडणूक आयोगाकडे केली आहे. दरम्यान, या प्रकरणी संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
मुख्य निवडणूक अधिकारी यांना लिहिलेल्या पत्रात कोटेचा यांनी शुक्रवारी दिवसाचा प्रचार संपल्यानंतर मुलुंड (पश्चिम) येथील एका हॉटेलमध्ये त्यांच्या टीम मेंबरसोबत जेवत असताना घडलेली घटना नमूद केली. हे पत्र वरिष्ठ पोलिस अधिकारी आणि निवडणूक निर्णय अधिकारी यांनाही पाठविले आहे.
पांढऱ्या रंगाच्या वॅगनआर या कारमध्ये तीन संशयास्पद व्यक्ती तेथे आल्या. त्यांनी माझ्या सुरक्षा पथकाला सांगितले की, मी त्यांना फोन करून भेटायला बोलावले आहे. माझ्या सुरक्षारक्षकांनी चौकशी केली तेव्हा त्यातील एका व्यक्तीने त्याचे नाव नितीन भाई असे सांगितले. मात्र, मी कोणालाही फोन केलेला नव्हता. तेच मी माझ्या सुरक्षा रक्षकांना सांगितले. पण माझा ठावठिकाणा त्यांना कसा कळला या विचाराने मला धक्का बसला, असे कोटेचा म्हणाले.
लोकसभेच्या प्रचारादरम्यान त्यांच्यावर अनेकदा हल्ले झाले. माझ्या बॅक ऑफिसवरही हल्ला करण्यात आला. दोनपेक्षा जास्त एफआयआर दाखल करण्यात आले. मला संशय आहे की, माझे विरोधक पुन्हा एकदा माझ्या जीवाचे बरेवाईट करण्याचा प्रयत्न करत आहेत. ते वाईट हेतूने माझ्या हालचालींवर लक्ष ठेवून आहेत, असे कोटेचा पुढे म्हणाले.