मुंबईतील मोकळ्या जागांची देखभाल पालिकाच करणार! ओपन स्पेस पॉलिसी तयार करण्याची मागणी

मुंबई महापालिकेच्या मालकीच्या मोकळ्या जागा, मैदाने आणि उद्यानांचा ताबा खासगी संस्था, संघटना अथवा तृतीय पक्षाला देण्यात येऊ नये. या जागांची देखभाल आणि व्यवस्थापन महापालिकेनेच करावे, अशी भूमिका भाजपने एकमताने घेतली आहे.
मुंबईतील मोकळ्या जागांची देखभाल पालिकाच करणार! ओपन स्पेस पॉलिसी तयार करण्याची मागणी
मुंबईतील मोकळ्या जागांची देखभाल पालिकाच करणार! ओपन स्पेस पॉलिसी तयार करण्याची मागणीप्रातिनिधिक छायाचित्र
Published on: 

मुंबई : मुंबई महापालिकेच्या मालकीच्या मोकळ्या जागा, मैदाने आणि उद्यानांचा ताबा खासगी संस्था, संघटना अथवा तृतीय पक्षाला देण्यात येऊ नये. या जागांची देखभाल आणि व्यवस्थापन महापालिकेनेच करावे, अशी भूमिका भाजपने एकमताने घेतली आहे. या निर्णयाची माहिती मंगळवारी मंत्री आशिष शेलार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांना देण्यात आली. तसेच मुंबईसाठी स्वतंत्र मोकळ्या जागांचे धोरण (ओपन स्पेस पॉलिसी) तयार करण्याची मागणी करण्यात आली.

मुंबई भाजप अध्यक्ष आणि आमदार अमीत साटम यांच्या मागणीवरून मंत्री आशिष शेलार यांनी या बैठकीचे आयोजन केले होते. बैठकीला मंत्री मंगलप्रभात लोढा, महापौर रितू तावडे, महापालिका आयुक्त अश्विनी भिडे तसेच महापालिकेतील अन्य पदाधिकारी आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते. मुंबई महापालिका निवडणुकीच्या जाहीरनाम्यात मोकळ्या जागांच्या संरक्षणाबाबत दिलेल्या आश्वासनानुसार शहरातील सर्व मैदानांचा आणि मोकळ्या जागांचा ताबा महापालिकेकडेच राहावा, यासाठी धोरण निश्चित करण्याची मागणी भाजप नेत्यांनी केली. काही दिवसांपूर्वी आमदार अमीत साटम यांच्या पुढाकाराने झालेल्या बैठकीतही याबाबत चर्चा झाली होती.

आंतरराष्ट्रीय सुविधा

मुंबईतील प्रत्येक प्रशासकीय विभागात दोन ते तीन मैदानांची निवड करून संपूर्ण मुंबईत सुमारे १०० मैदानांवर आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रीडा सुविधा विकसित कराव्यात, अशी सूचना आमदार अमीत साटम यांनी केली. या सुविधांसाठी महापालिकेच्या निधीसह 'पार्टिसिपेट मुंबई'च्या माध्यमातून उपलब्ध होणाऱ्या कॉर्पोरेट सामाजिक दायित्वाच्या (सीएसआर) निधीचा वापर करावा. मात्र, सुविधा उभारणीत खासगी संस्था अथवा तृतीय पक्षाचे अधिकार निर्माण होणार नाहीत, याची दक्षता घ्यावी, असे त्यांनी स्पष्ट केले.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)