

मुंबई : पुण्यातील शासकीय तंत्रशिक्षण महाविद्यालयात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे छायाचित्र हटविल्याच्या वादाचे पडसाद मंगळवारी मुंबईत उमटले. मनसे नेते अमित ठाकरे यांच्या कृतीचा निषेध करण्यासाठी भाजप युवा मोर्चाने माहिममध्ये आंदोलन केले. मात्र, पोलिसांनी कार्यकर्त्यांना ताब्यात घेतल्याने संभाव्य वाद टळला. दरम्यान, माहिम परिसरात भाजप आणि मनसे कार्यकर्ते आमनेसामने आल्याने तणाव निर्माण झाला होता.
युवा मोर्चाचे अध्यक्ष कृष्णराज महाडिक यांनी माहिमहून शिवतीर्थाकडे जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. त्यानंतर महाडिक यांनी मनसे कार्यकर्त्यांवर गंभीर आरोप केले. “शांततेत आंदोलन करणाऱ्या भाजयुमो कार्यकर्त्यांना मारहाण करण्यात आली, काचेच्या बाटल्या फेकण्यात आल्या, तसेच काही कार्यकर्त्यांच्या सोनसाखळ्या खेचण्यात आल्या,” असा दावा त्यांनी केला.
माहिम परिसरात तणाव
भाजयुमोचे कार्यकर्ते आणि मनसे कार्यकर्त्यांमध्ये धक्काबुक्की तसेच घोषणाबाजी झाली. परिस्थिती चिघळू नये म्हणून पोलिसांनी दोन्ही बाजूंच्या कार्यकर्त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, शिवतीर्थाकडे जाण्यापासून भाजयुमोला रोखण्यात आले असले तरी दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमधील संघर्षामुळे दादर-माहिम परिसरात दिवसभर तणावाचे वातावरण होते.