मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेला ‘अब की बार, चारसो पार’ हा नारा बुलंद करण्याचे नियोजन आहे. तसेच गुढीपाडव्या दिवशी राम मंदिराच्या निर्माणाच्या पार्श्वभूमीवर हिंदुत्वाची गुढी उभारून स्वागत करूया, असे आवाहन मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांनी केले.
मुंबई भाजपच्या सुकाणू समितीची बैठक वांद्रे येथे रंगशारदामध्ये झाली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना शेलार यांनी हे आवाहन केले. या बैठकीला मंत्री मंगलप्रभात लोढा, खासदार गोपाळ शेट्टी, मनोज कोटक, आमदार अतुल भातखळकर, प्रसाद लाडस प्रवीण दरेकर, मनीषा चौधरीस अमित साटम, आदी उपस्थित होते.
आशिष शेलार म्हणाले की, मुंबईतील महायुतीचे सहाही उमेदवार मोठ्या मताधिक्याने निवडून आणण्याकरिता आवश्यक ते कार्यक्रम राबवण्यासंबंधी चर्चा बैठकीत झाली. महायुतीच्या प्रचारात आम्ही सर्वात पुढे राहू. गुढी पाढव्याला हिंदुत्वाची गुढी उभारून १ हजार ठिकाणी बैठका आणि जनसभांचे नियोजन केले आहे. सीएएच्या समर्थनातही भाजप मैदानात उतरणार आहे.
उबाठावर टीका
पळवणं आणि पळणं ही दोन्ही पळपुटेपणाची लक्षणं उबाठा सेनेची आहेत. उबाठा सेनेला आव्हान आहे की, हिंमत असेल तर निवडणुकीत एकटे आमच्यासमोर या. आपल्या स्वार्थासाठी वडिलांचे विचार, वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचे हिंदुत्व उद्धवजींनी सोडले, मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीसाठी अहमद पटेल ते शर्जील उस्मानी यांच्यासमोर मुजरा केला, त्यांना हिंदुत्ववादी मतदारांनी झिडकारलंय, हे सत्य चित्र आहे. स्वतःच्या पक्षासाठी गर्दी जमवू शकत नाहीत म्हणून आता २२ पक्षांना एकत्र घेऊन शिवाजी पार्कवर गर्दी जमवावी लागते, अशी उद्धवजींची आजची अवस्था आहे, अशी टीकाही शेलार यांनी केली.