आशिष शेलार यांनी घेतली सलमान खानची भेट

आशिष शेलार यांनी एक्स या समाज माध्यमांवरून या भेटीची स्वत: माहिती दिली आहे. उत्तर मध्य मधून अद्याप भाजपने उमेदवारी जाहीर केलेली नाही. विद्यमान खासदार पूनम महाजन यांच्या जागी आशिष शेलार यांना या मतदारसंघातून संधी देण्यात येउ शकते अशी चर्चा आहे.
आशिष शेलार यांनी घेतली सलमान खानची भेट

प्रतिनिधी/मुंबई

मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांनी अभिनेता सलमान खान याची त्याच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली आहे. मुंबई उत्तर मध्य मतदारसंघातून पूनम महाजन यांच्या जागी आशिष शेलार यांना भाजपकडून उमेदवारी मिळणार असल्याची चर्चा सुरू आहे. या पार्श्वभूमीवर या भेटीला महत्त्व आले आहे. या भेटीच्या वेळी सलमान खान यांचे वडील सलीम आणि हेलन हे देखील उपस्थित होते.

आशिष शेलार यांनी एक्स या समाज माध्यमांवरून या भेटीची स्वत: माहिती दिली आहे. उत्तर मध्य मधून अद्याप भाजपने उमेदवारी जाहीर केलेली नाही. विद्यमान खासदार पूनम महाजन यांच्या जागी आशिष शेलार यांना या मतदारसंघातून संधी देण्यात येउ शकते अशी चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर शेलार सलमान खान भेटीला महत्त्व आले आहे. सलमान खान स्वत: या मतदारसंघात राहतो. आधीच्या निवडणुकांत सलमान खान याने बाबा सिद्दीकी यांचा प्रचार केल्याने आशिष शेलार आणि सलमान खान यांच्यातील संबंध ताणले गेले होते. बाबा सिद्दीकी हे आशिष शेलार यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार होते. मात्र आताच्या या भेटीने हे ताणलेले संबंध मिटवून मैत्रीचे संबंध निर्माण करण्याचा आशिष शेलार यांचा हा प्रयत्न यशस्वी ठरल्याचे मानण्यात येत आहे. आशिष शेलार यांनी दुपारचे जेवण सलमान खान आणि कुटुंबीयांसोबत घेतले.

बाबा सिद्दीकी देखील आता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात आहेत. पर्यायाने ते देखील महायुतीत आले आहेत. पूनम महाजन यांच्या जागी जर आशिष शेलार यांना उमेदवारी मिळाली तर सलमान खान याच्याशी मैत्रीपूर्ण संबंधांचा आशिष शेलार यांना फायदाच होणार आहे. सलमान खान याचा चाहता वर्ग मोठ्या प्रमाणात आहे. सलमानच्या या चाहता वर्गाची मते आपल्यासाठी फिरविण्यात आशिष शेलार यांना मदत होणार आहे. दरम्यान, आशिष शेलार यांच्या उमेदवारीची अधिकृत घोषणा झालेली नसली तरी त्यांनी मतदारसंघात भेटी गाठी घेण्यास सुरुवात केली आहे.

logo
marathi.freepressjournal.in