स्वीकृत नगरसेवकांसह बदलणार समित्यांचे गणित; भाजप-शिंदे कोकण आयुक्तांकडे एकत्र नोंदणीची शक्यता

मुंबई महापालिकेच्या निवडणुकीनंतर ठाकरेंची सेना, काँग्रेस, मनसे, एमआयएमच्या नगरसेवकांनी कोकण आयुक्त कार्यालयात नोंदणी केली. मात्र भाजप व शिंदे सेना एकत्र नोंदणी करणार असल्याचे समजते.
स्वीकृत नगरसेवकांसह बदलणार समित्यांचे गणित; भाजप-शिंदे कोकण आयुक्तांकडे एकत्र नोंदणीची शक्यता
स्वीकृत नगरसेवकांसह बदलणार समित्यांचे गणित; भाजप-शिंदे कोकण आयुक्तांकडे एकत्र नोंदणीची शक्यता
Published on

मुंबई : मुंबई महापालिकेच्या निवडणुकीनंतर ठाकरेंची सेना, काँग्रेस, मनसे, एमआयएमच्या नगरसेवकांनी कोकण आयुक्त कार्यालयात नोंदणी केली. मात्र भाजप व शिंदे सेना एकत्र नोंदणी करणार असल्याचे समजते. भाजप व शिवसेनेची एकाच गटाची नोंदणी झाल्यास सभागृहातील पदनिर्देशित सदस्य अर्थात स्वीकृत नगरसेवकांसह वैधानिक आणि विशेष समित्यांमधील सदस्यांची समीकरणे बदलली जाण्याची शक्यता आहे. यामुळे वैधानिक आणि विशेष समित्यांमध्ये भाजप-शिवसेनेची गणसंख्या वाढलेली पाहायला मिळणार आहे तसे झाल्यास महायुतीतील घटक पक्षांचे संख्याबळ वाढून विरोधकांचे संख्याबळ कमी होणार आहे.

मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत भाजपचे ८९, तर शिवसेनेचे २९ नगरसेवक निवडून आले आहेत, तर उबाठाचे ६५ नगरसेवक निवडून आले आहेत. उबाठाचे ६५ आणि काँग्रेसचे २४ तसेच मनसेचे ६ या सर्वांची कोकण भवनामध्ये नोंदणी झाली आहे.

मात्र, सभागृहात एमआयएमचा एक स्वीकृत नगरसेवक वाढत असल्याने भाजप आणि शिवसेनेने स्वतंत्र नोंदणी न करता एक गट स्थापन करून नोंदणी केल्यास एमआयएमचा एक सदस्य कमी होऊन भाजप आणि शिवसेनेचे एकूण सहा स्वीकृत निवडून येऊ शकतात.

एमआयएमला रोखण्यासाठी भाजपची रणनीती सध्या स्वतंत्र गट ठेवल्यास भाजपचे चार आणि शिवसेनेचा एक अशा प्रकारे पाच सदस्य निवडून येणार होते. ही समीकरणे दोन्ही पक्षाचे एकत्र गट बनवल्यास बदलली जाऊ शकतात तसेच स्थायी समिती, शिक्षण समिती, बेस्ट समिती आणि सुधार समितीमध्ये भाजप आणि शिवसेनेचा एक सदस्य तसेच विशेष समित्यांमध्ये दोन सदस्य वाढले जाऊ शकतात. त्यामुळे एमआयएमचा एक स्वीकृत नगरसेवक कमी करून महायुतीचा एक सदस्य वाढवणे आणि वैधानिक तसेच विशेष समित्यांमध्ये एक गट करून आपला एक सदस्य वाढवणे यासाठी भाजप आणि शिवसेनेचा प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे शनिवारी हे दोन्ही पक्ष स्वतंत्र नोंदणी न करता एकत्रपणे नोंदणी करू शकतात, अशी माहिती मिळत आहे.

logo
marathi.freepressjournal.in