Mumbai : भाजप व शिंदे सेनेची मदार दादांच्या तीन नगरसेवकांवर; दोन्ही पक्षनेतृत्वाकडून मोर्चेबांधणी

अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नवनिर्वाचित तीन नगरसेवक हाताला लागले तर आकड्यांची कटकटच दूर होणार आहे. त्यामुळे अजित पवारांच्या तीन नगरसेवकांना वळवण्यासाठी दोन्ही पक्ष नेतृत्वाकडून मोर्चेबांधणी सुरू असल्याचे समजते.
Mumbai : भाजप व शिंदे सेनेची मदार दादांच्या तीन नगरसेवकांवर; दोन्ही पक्षनेतृत्वाकडून मोर्चेबांधणी
Published on

मुंबई : मुंबई महापालिकेतील सुधार समितीतील आकड्यांचे गणित जुळवण्यासाठी भाजप व शिंदे सेनेचे नवनिर्वाचित नगरसेवक कोकण आयुक्तांकडे एकत्र नोंदणी करणार असल्याचे दोन्ही पक्षांच्या नेत्यांकडून सांगण्यात आले आहे. मात्र भाजप व शिंदे सेनेने एकत्र नोंदणी केल्यास शिंदे सेनेचा ना गटनेते पद राहणार ना पालिका मुख्यालयात २९ नगरसेवकांना पक्ष कार्यालय मिळणार. त्यामुळे एकत्र नोंदणी करायची की, नाही आसा पेच शिंदे सेनेला पडला आहे. दरम्यान, अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नवनिर्वाचित तीन नगरसेवक हाताला लागले तर आकड्यांची कटकटच दूर होणार आहे. त्यामुळे अजित पवारांच्या तीन नगरसेवकांना वळवण्यासाठी दोन्ही पक्ष नेतृत्वाकडून मोर्चेबांधणी सुरू असल्याचे समजते.

मुंबई महापालिकेच्या निवडणुकीचा निकाल १६ जानेवारीला जाहीर झाला. महापालिका निवडणुकीत भाजप व शिंदे सेनेला सत्ता स्थापनेचा कौल दिला आहे. मात्र, महापौर पद, सभागृह नेते पद आणि सुधार समिती अध्यक्ष पद यावरून भाजप व शिवसेनेत रस्सीखेच सुरू आहे. त्यामुळे अद्याप दोन्ही पक्षांच्या नवनिर्वाचित नगरसेवकांनी कोकण आयुक्तांकडे नोंदणी करणे टाळले आहे. परंतु आता भाजप व शिंदे सेनेने एकत्र नोंदणी करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र भाजप गटात शिवसेनेचे नगरसेवक दाखल झाले तर भाजपला कार्यालय मिळणार आहे तर शिवसेनेचा स्वतंत्र गट नसल्यामुळे त्यांना पक्ष कार्यालय मिळण्यात तांत्रिक अडचणी येऊ शकते.

... तरच शिंदे सेनेला मान!

भाजप शिवसेना एक गट झाल्यावर शिवसेनेचा गटनेता राहणार नाही. त्यामुळे महापौरांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या गटनेतेच्या बैठकीत शिवसेनेला स्थान मिळणार नाही. मात्र, भाजपने शिवसेनेसाठी सभागृह नेता पद सोडल्यास त्यांना गटनेता बैठकीत सहभागी होता येणार आहेत तसेच सभागृह नेता म्हणून स्वतंत्र दालन व कार्यालयीन मिळणार आहे. पण हे सर्वस्वी भाजपावर अवलंबून आहे.

... तर एमआयएमचे पद धोक्यात

अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नवनिर्वाचित तीन नगरसेवक भाजप किंवा शिंदे सेनेच्या गळाला लागले तर दोन्ही पक्षांचे संख्याबळ वाढेल आणि प्रत्येक समितीवर दोन्ही पक्षाचे वर्चस्व राहणार आहे. मात्र, एमआयएमला सुधार समितीसह अन्य समितीतील सदस्य पद धोक्यात येणार आहे.

महापौर पदाची निवडणूक आणखी लांबणीवर

मुंबई महापालिका निवडणुकीचा निकालानंतर भाजप व शिंदे सेना व अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी नोंदणीच केलेली नाही. मंगळवार ३ फेब्रुवारीला नोंदणी केल्यानंतर पुढील ७ दिवसांनंतर महापौर पदाची निवड होणे अपेक्षित आहे. परंतु अंगणेवाडीची जत्रा ९ फेब्रुवारीला आल्याने सगळ्याच पक्षाचे नगरसेवक कोकणात दाखल होतात. त्यामुळे १२ फेब्रुवारीपर्यंत महापौर व उपमहापौर पदाची निवड प्रक्रिया पार पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

logo
marathi.freepressjournal.in