Mumbai : भूखंड आरक्षणावरून सत्ताधाऱ्यांमध्ये वादावादी; सुधार समितीत भाजप-शिवसेना आमनेसामने, भाजप सदस्यांचा सभात्याग

जोगेश्वरी येथील मजास डेपो परिसरातील म्हाडा भूखंडाचे आरक्षण बदलून निवासी बांधकाम आरक्षण टाकण्याचा प्रस्ताव बुधवारी झालेल्या सुधार समितीच्या बैठकीत मंजुरीसाठी सादर करण्यात आला.
Mumbai : भूखंड आरक्षणावरून सत्ताधाऱ्यांमध्ये वादावादी; सुधार समितीत भाजप-शिवसेना आमनेसामने, भाजप सदस्यांचा सभात्याग
Mumbai : भूखंड आरक्षणावरून सत्ताधाऱ्यांमध्ये वादावादी; सुधार समितीत भाजप-शिवसेना आमनेसामने, भाजप सदस्यांचा सभात्याग संग्रहित छायाचित्र
Published on

मुंबई : जोगेश्वरी येथील मजास डेपो परिसरातील म्हाडा भूखंडाचे आरक्षण बदलून निवासी बांधकाम आरक्षण टाकण्याचा प्रस्ताव बुधवारी झालेल्या सुधार समितीच्या बैठकीत मंजुरीसाठी सादर करण्यात आला. मात्र भूखंड आरक्षण बदलावरून भाजप व शिंदे सेनेच्या सदस्यांमधील मतभेद उघड झाले.‌ अखेर भाजपच्या सदस्यांनी सभात्याग केला आणि भाजप व शिंदे सेनेतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला.

जोगेश्वरी पूर्व येथील माझास परिसरातील म्हाडाच्या १,८०२.७५ चौरस मीटर भूखंडासंदर्भातील प्रस्ताव हा वादाचा केंद्रबिंदू ठरला. या भूखंडावरील आरआर २.१ (पुनर्वसन व पुनर्स्थापन) आरक्षण रद्द करून ती जागा लगतच्या निवासी क्षेत्रात समाविष्ट करण्याचा प्रस्ताव प्रशासनाने सुधार समितीसमोर ठेवला होता. भाजप सदस्यांनी या प्रस्तावाला विरोध करत तो नाट टेकन करण्याची मागणी केली होती.

मात्र शिवसेनेच्या नगरसेविका संध्या दोशी यांच्या अध्यक्षतेखालील समितीने भाजपचा विरोध डावलत प्रस्ताव मंजूर केला. यानंतर भाजप सदस्यांनी बैठकीतून सभात्याग केला. विशेष म्हणजे बैठकीचे कामकाज पूर्ण होण्यापूर्वीच भाजप सदस्य बाहेर पडल्याने या घटनेची महापालिका वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

सुधार समितीतील भाजप सदस्य यापूर्वीही त्यांच्या पक्ष नेतृत्वाकडे नाराजी व्यक्त करत होते. मुंबई भाजप अध्यक्ष आमदार अमित साटम यांच्यासमोरही काही सदस्यांनी समितीत त्यांच्या संमतीशिवाय प्रस्ताव मंजूर होत असल्याची तक्रार केली होती. तसेच विरोध असूनही विषय मतदानाला न लावण्याच्या पद्धतीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले होते.

भाजपच्या भूमिकेवर आक्षेप

विरोधी पक्षातील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाने सत्ताधाऱ्यांच्या या संघर्षावर टीका केली आहे. उद्धव सेनेचे नगरसेवक विठ्ठल लोकरे यांनी, भाजपने केवळ सभात्याग करण्याऐवजी प्रस्तावाला ठाम विरोध करायला हवा होता, असे मत व्यक्त केले. तर सुधार समितीतील उद्धवसेनेचेच नगरसेवक सचिन पडवळ यांनी महायुतीच्या दोन्ही पक्षांवर निशाणा साधला. “ज्या प्रस्तावांना त्यांची अंतर्गत संमती असते ते मंजूर करून घेतले जातात आणि जनतेचा रोष टाळण्यासाठी सार्वजनिकरित्या मतभेद दाखवले जातात. खरोखरच प्रस्तावाला विरोध असता तर तो फाडून टाकून सभात्याग केला असता. महासभेतही हा प्रस्ताव रोखण्याची संधी त्यांच्याकडे आहे, मात्र ते तसे करणार नाहीत,” असा आरोप पडवळ यांनी केला.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in