

स्विटी भागवत/मुंबई
मुंबईतील मोक्याचे ठिकाण असलेल्या वांद्रे-कुर्ला संकुल अर्थात बीकेसीमधील महानगर टेलिफोन निगम लिमिटेडच्या (एमटीएनएल) मालकीच्या इमारतीचे भाडेपट्ट्याचे हक्क ‘नॅशनल बँक फॉर ॲग्रिकल्चर अँड रुलर डेव्हलपमेंट’ने (नाबार्ड) खरेदी केले आहेत. ‘एमटीएनएल’च्या या व्यावसायिक मालमत्तेसाठी नाबार्डने ३५०.७२ कोटी रुपये मोजले असून, या व्यवहाराची नोंदणी नुकतीच पूर्ण झाली आहे. या मोठ्या मालमत्ता व्यवहारासाठी नाबार्डने २१.०४ कोटी रुपयांचे मुद्रांक शुल्क भरल्याची माहिती रिअल इस्टेट डेटा ॲनालिटिक्स फर्म 'सीआरई मॅट्रिक्स'कडून प्राप्त झालेल्या कागदपत्रांमधून समोर आली आहे.
हा व्यवहार बीकेसीमधील जीएन ब्लॉक येथील प्लॉट क्रमांक आर-४ शी संबंधित आहे. सुमारे २,६८० चौरस मीटर जमिनीवर पसरलेल्या दोन इमारतींच्या या व्यावसायिक संकुलाचे एकूण बांधकाम क्षेत्र ४,०२१.४३ चौरस मीटर इतके आहे. ८ मे रोजी या मालमत्तेच्या भाडेपट्ट्याबाबतचा कायदेशीर दस्तावेज नोंदवण्यात आला.
बीकेसी हे मुंबईतील प्रमुख आर्थिक आणि व्यावसायिक केंद्र असून येथे अनेक बँका, बहुराष्ट्रीय कंपन्या आणि सरकारी कार्यालये आहेत. नाबार्ड या जागेचा वापर कार्यालयीन कामकाजासाठी करण्याची शक्यता आहे.
३० मार्च २०२६ पासून या मालमत्तेशी संबंधित सर्व भविष्यातील देणी, जसे की जमिनीचे भाडे, हस्तांतरण शुल्क, महापालिका कर आणि देखभाल शुल्काची जबाबदारी आता नाबार्डवर असेल. ‘एमटीएनएल’ने या मालमत्तेवरील आपले सर्व हक्क पूर्णपणे सोडले असून त्यांना व्यवहाराची संपूर्ण रक्कम प्राप्त झाली आहे. बीकेसीमध्ये जमिनीची उपलब्धता मर्यादित असताना झालेला हा महत्त्वपूर्ण संस्थात्मक व्यवहार मानला जात आहे.
भाडेपट्ट्याची ५२ वर्षांची मुदत अद्याप शिल्लक
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) एप्रिल १९९८ मध्ये ‘एमटीएनएल’ला ही जागा ८० वर्षांच्या भाडेपट्ट्याने दिली होती. या भाडेपट्ट्याची मुदत अजून ५२ वर्षे शिल्लक असून आता नाबार्डकडे या जागेचे हक्क २०७८ पर्यंत राहतील. या हस्तांतरासाठी एमएमआरडीएची रीतसर परवानगी घेण्यात आली आहे.