

मुंबई : देवनार क्षेपणभूमीवरील कचऱ्याचे ढिगारे हटविणे, नाल्यांमधील गाळ काढणे, कचऱ्याचे स्थलांतर करणे तसेच क्षेपणभूमीवरील विविध कामे वेगाने करण्यासाठी मुंबई महापालिका १२ पोकलेन मशीन भाड्याने घेणार आहे. या कामासाठी वर्षभरात सुमारे ७ कोटी ७२ लाख रुपये खर्च अपेक्षित असून, त्यासंदर्भातील प्रस्ताव स्थायी समितीच्या मंजुरीसाठी सादर करण्यात आला आहे.
देवनार क्षेपणभूमी ही मुंबई महापालिकेची सर्वांत मोठी क्षेपणभूमी असून तिचे क्षेत्रफळ सुमारे १२० हेक्टर आहे. महापालिकेच्या विविध विभागांतून तसेच कचरा स्थानांतरण केंद्रांमधून दररोज अंदाजे ६०० ते ७०० मेट्रिक टन कचरा येथे आणला जातो. याशिवाय दररोज सुमारे ८०० ते ९०० मेट्रिक टन बांधकामाचा राडारोडा वापरून कचऱ्याच्या ढिगाऱ्यांवर आच्छादन केले जाते.
पोकलेनसाठी नव्याने कंत्राट देणार
देवनार क्षेपणभूमीवरील कामे वर्षभर सुरू असतात. येथे नवीन लूप तयार करणे, कचरा व बांधकाम साहित्याचे स्थलांतर करणे, मुख्य रस्त्यांवरील नाल्यांमधील गाळ काढणे, रस्त्यांवर साचलेले साहित्य हटविणे आणि कचऱ्याचे ढिगारे व्यवस्थित पसरविणे यांसारख्या कामांसाठी पोकलेन मशीनची आवश्यकता असते. सध्या वापरात असलेल्या कंत्राटाची मुदत ३० सप्टेंबर २०२६ रोजी संपली आहे. त्यामुळे पुढील कामांसाठी नव्याने कंत्राट देण्याची प्रक्रिया करण्यात आली आहे.
महापालिकेने पोकलेन मशीन भाड्याने घेण्यासाठी ई-निविदा मागवल्या होत्या. १ सप्टेंबर २०२६ रोजी तीन निविदा प्राप्त झाल्या.
असे आहे दरपत्रक
या कंपनीने प्रति पोकलेन मशीन, १२ तासांच्या एका पाळीसाठी १६ हजार ९५३ रुपये दर दिला आहे. एकूण ४ हजार ३८० पाळ्यांसाठी ७ कोटी ४२ लाख ५४ हजार १४० रुपये खर्च अपेक्षित आहे. त्यावर चार टक्के सानुग्रह रक्कम म्हणून २९ लाख ७० हजार १६५ रुपये ६० पैसे धरून एकूण कंत्राट मूल्य ७ कोटी ७२ लाख २४ हजार ३०५ रुपये ६० पैसे इतके निश्चित करण्यात आले आहे.
अर्थसंकल्पातही तरतूद
कामासाठी महापालिकेने निश्चित केलेला अंदाजित दर प्रति पाळी १७ हजार ५४ रुपये ४० पैसे होता. तुलनेत मे. अंशुमन अँड कंपनीचा दर ०.५९ टक्क्यांनी कमी आहे. मे. एस. के. डेव्हलपर्सने प्रति पाळी १८ हजार ९०० रुपये, तर मे. एम मोना इंटरप्रायझेसने २० हजार ३२० रुपये दर सादर केला होता. नवीन कंत्राटाची मुदत ४ हजार ३८० पाळ्या किंवा ४०० दिवस, यापैकी जे आधी पूर्ण होईल तोपर्यंत राहणार आहे. या कामासाठी २०२६-२७ या आर्थिक वर्षात ४ कोटी १५ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली असून आवश्यक उर्वरित तरतूद २०२७-२८ च्या अर्थसंकल्पात केली जाणार आहे.
वीज प्रकल्प डिसेंबरपर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा
देवनार येथील कचऱ्यापासून वीजनिर्मिती करणारा प्रकल्प डिसेंबर २०२६ पर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. मात्र, बायोमायनिंगचे काम सुरू होईपर्यंत आणि वीजनिर्मिती प्रकल्प पूर्ण होईपर्यंत क्षेपणभूमीवरील दैनंदिन कामे सुरक्षितपणे पार पाडण्यासाठी पोकलेन मशीनची उपलब्धता आवश्यक असल्याचे प्रशासनाने प्रस्तावात नमूद केले आहे. त्यामुळे देवनार क्षेपणभूमीवरील कचरा व्यवस्थापनाची कामे सुरळीत ठेवण्यासाठी मे. अंशुमन अँड कंपनीकडून पोकलेन मशीन भाड्याने घेण्यास स्थायी समितीची मंजुरी मागण्यात आली आहे.