

मुंबई : मुंबई महापालिकेच्या माध्यमातून विविध प्रकल्प राबविण्यात येत आहेत. या प्रकल्पांसाठी ठेवी मोडून पैसा वापरला जात आहे. मुंबई महापालिकेच्या ठेवीत सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांचा पीएफचे पैसे, कंत्राटदारांची अनामत रक्कम यांचा समावेश असून, त्यावर या सर्व ठेवींचा डोलारा उभा आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेवर २ लाख ४४ हजार कोटींचे कर्ज असून त्याची परतफेड कशी करणार, असा सवाल काँग्रेसचे गटनेते आश्रफ आजमी यांनी उपस्थित केला. दरम्यान, मराठी नाटक व मराठी चित्रपट मनोरंजन करमुक्त करण्यात यावे, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.
गोरेगाव-मुलुंड लिंक रोड, वर्सोवा-दहिसर-भाईंदर कोस्टल रोड असे प्रकल्प राबविण्यात येत आहेत. त्यामुळे या प्रकल्पांच्या पूर्ततेसाठी पैसा कुठून आणणार? मुंबई महापालिकेच्या ठेवी मोडून प्रकल्प खर्च भागवण्यात येत आहे. मात्र, या ठेवींत ४५ हजार कोटी पालिकेच्या सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांचे पीएफचे पैसे देणे, कंत्राटदारांची अनामत रक्कम अशा प्रकारच्या ठेवी आहेत. या ठेवी विविध बँकांमध्ये असून त्यावर ५.५० टक्के व्याज मिळते. मात्र, पोस्ट ऑफिसमध्ये ७ टक्के, आरबीआय बाँडमध्ये गुंतवणूक केल्यास ७ टक्के व्याज मिळते. मुंबई महापालिका विविध बँकांमध्ये ठेवी ठेवत असल्याने कमी व्याज मिळत असून, गेल्या १० वर्षांत यामुळे ५ ते ६ सहा हजार कोटींचे नुकसान झाल्याचा आरोप आश्रफ आजमी यांनी केला. याबाबत २०२२-२६ या कालावधीतील श्वेतपत्रिका काढावी, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.
उत्पन्नवाढीसाठी झोपडपट्टी भागांत ‘फोटोपास’ द्यावेत
मुंबईची लोकसंख्या १ कोटी २४ लाखांवर पोहोचली आहे. यापैकी ६८ लाख लोक झोपडपट्टी भागात राहतात. मुंबई महापालिकेचे उत्पन्नाचे मुख्य स्त्रोत मालमत्ता कर आहे. झोपडपट्टी भागात पालिका ‘फोटोपास’ बनवून देत नाही.
सगळ्याच नाही, पण काही लाख लोकांचा फोटोपास बनवून दिला तर मुंबई महापालिकेला वर्षाला ५५२ कोटींचा महसूल प्राप्त होईल. त्यामुळे मुंबई महापालिकेने महसूल वाढीसाठी या गोष्टींचा विचार करावा, अशी सूचना एमआयएमचे नगरसेवक जमीर कुरेशी यांनी केली.
नाल्यांशेजारील बेकायदा बांधकामे हटवावीत
नाल्यांशेजारी असलेली बेकायदा बांधकाम पालिकेच्या अखत्यारित हटली पाहिजेत. नालेसफाईच्या कामासाठी डिसेंबर, जानेवारीत निविदा काढल्या पाहिजेत, परंतु नालेसफाई नाही ‘हात सफाई’ होत आहे, असा आरोप त्यांनी यावेळी केला.
पालिकेच्या जागा देताना १ टक्का भाडेवाढ करावी
मुंबई महापालिका आपल्या जागा ३० वर्षांसाठी भाडेतत्त्वावर देते. मात्र, भाड्याने दिलेल्या जागेवर संबंधित व्यक्ती लग्नासाठी जागा देतो आणि एकावेळी ५० हजार रुपये महसूल प्राप्त करतो. त्यामुळे मुंबई महापालिकेने भाडेतत्त्वावर जागा देताना १ टक्का भाडेवाढ करावी, जेणेकरून मुंबई महापालिकेच्या महसुलात भर पडेल, असेही जमीर कुरेशी म्हणाले.
मनुष्यबळाची कमतरता
लेखा परीक्षण व चिटणीस विभागात रिक्त पदे आहेत, असे स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांनी आपल्या भाषणात नमूद केले आहे. चिटणीस विभागातील शिपाई रात्री उशिरा स्थायी समितीचे प्रस्ताव घेऊन नगरसेवकांच्या घरी येतात. आधीच या विभागात मनुष्यबळाची कमतरता आहे, त्यामुळे आधी लेखा परीक्षण व चिटणीस विभागात रिक्त पदे भरा, अशी सूचना मनसेचे गटनेते यशवंत किल्लेदार यांनी केली. मराठी शाळा वाढीवर भर द्यावा, अशी सूचनाही यशवंत किल्लेदार यांनी यावेळी केली.