

मुंबई : मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत महिला उमेदवारांनी आपली छाप सोडली आहे. मुंबईतील २२७ प्रभागासाठी पार पडलेल्या निवडणुकीत तब्बल १३५ महिला विजयी झाल्या आहेत. त्यामुळे मुंबई महापालिकेत महिलांचा बोलबाला असणार आहे. विशेष म्हणजे पालिका मुख्यालयातील सभागृहात ५० टक्क्यांहून अधिक महिलांची उपस्थिती असणार आहे.
यंदाच्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत २२७ प्रभागासाठी १७०० उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. यात ८२१ पुरुष तर ८७९ महिला उमेदवार रिंगणात उतरल्या होत्या. विशेष म्हणजे डॉक्टर, वकील उच्च शिक्षित महिला उमेदवार उभ्या होत्या. स्थानिक प्रश्न, नागरी सुविधा, आरोग्य, शिक्षण, स्वच्छता तसेच महिलांशी संबंधित मुद्द्यांवर केंद्रीत प्रचाराचा थेट फायदा महिला उमेदवारांना झाला. राजकीय विश्लेषकांचे मत आहे. या निकालांमुळे आगामी महापालिका कारभारात महिलांचा सहभाग आणि प्रभाव अधिक वाढणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
महिला विजयी उमेदवारांच्या संख्येत भारतीय जनता पक्ष आघाडीवर राहिला आहे. भाजपकडून ४८ महिला उमेदवार विजयी झाल्या. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटातून ३९ महिला उमेदवार विजयी झाल्या. शिवसेना (एकनाथ शिंदे गट) कडून २० महिला विजयी झाल्या. काँग्रेसकडून १३ महिला, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून ५ महिला, तर एमआयएम ४, राष्ट्रवादी काँग्रेस ३ आणि समाजवादी पक्षाकडूनही २ महिला उमेदवारांनी विजय मिळवला आहे. एकूणच, २०२६ च्या महापालिका निवडणुकीत ‘महिलाच सरस’ ठरल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. थोडक्यात मुंबई महापालिकेचा कारभार आता महिला नगरसेवकांच्या हाती राहणार आहे.
या पक्षाच्या महिला उमेदवार विजयी
भारतीय जनता पक्ष - ४८
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) ३९
शिवसेना (एकनाथ शिंदे गट)- २०
काँग्रेस - १३
एमआयएम - ०४
मनसे - ०५
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष - ०३
समाजवादी पक्ष - ०२