Mumbai : कंपन्यांनी थकवला २३३ कोटी मालमत्ता कर; दहा ते १५ वर्षांपासून BMC ला वसुलीत अपयश

सामान्य मुंबईकरांकडून मालमत्ता कराची वसुली करण्यासाठी प्रसंगी कठोर होणाऱ्या मुंबई महापालिकेला बड्या होर्डिंग कंपन्या आणि मोबाईल टॉवर कंपन्यांकडून कोट्यवधी रुपयांचा कर वसूल करण्यात अपयश आले आहे. या कंपन्यांनी २३३ कोटी २८ लाख रुपयांचा कर थकवला आहे.
Mumbai : कंपन्यांनी थकवला २३३ कोटी मालमत्ता कर; दहा ते १५ वर्षांपासून BMC ला वसुलीत अपयश
Mumbai : कंपन्यांनी थकवला २३३ कोटी मालमत्ता कर; दहा ते १५ वर्षांपासून BMC ला वसुलीत अपयश
Published on: 

मुंबई : सामान्य मुंबईकरांकडून मालमत्ता कराची वसुली करण्यासाठी प्रसंगी कठोर होणाऱ्या मुंबई महापालिकेला बड्या होर्डिंग कंपन्या आणि मोबाईल टॉवर कंपन्यांकडून कोट्यवधी रुपयांचा कर वसूल करण्यात अपयश आले आहे. या कंपन्यांनी २३३ कोटी २८ लाख रुपयांचा कर थकवला आहे.

गेल्या दहा ते १५ वर्षांपासून या कंपन्यांनी मालमत्ता कर थकवला आहे. वारंवार पत्रव्यवहार करून, मागणीपत्रे आणि नोटिसा पाठवूनही कंपन्यांनी प्रतिसाद दिलेला नाही. सामान्य करदात्यांकडून वसुलीच्या बाबतीत तत्परता दाखवणाऱ्या प्रशासनाला बड्या कंपन्यांकडून करवसुली करण्यात अपयश येत असल्याचे आकडेवारीतून स्पष्ट झाले आहे. मालमत्ता कर हा महापालिकेच्या उत्पन्नाचा प्रमुख स्रोत असताना त्याच कराची शेकडो कोटींची रक्कम वर्षानुवर्षे थकीत आहे. मुंबईत पश्चिम आणि पूर्व द्रुतगती महामार्ग, प्रमुख रस्ते, इमारती तसेच विविध खासगी जागांवर एक हजार ६०० हून अधिक लहान-मोठे होर्डिंग उभारले आहेत. यात साध्या होर्डिंगबरोबरच डिजिटल जाहिरात फलकांचाही समावेश आहे. या जाहिरात फलकांसाठी जागेचा व्यावसायिक वापर करून कंपन्या मोठा महसूल मिळवत असताना त्यांनी ८२ कोटी ९० लाख रुपयांचा मालमत्ता कर मात्र थकवला आहे.

२०२४ मध्ये भांडुपमधील झोपडपट्टी परिसरात मोबाईल टॉवर कोसळून अनेक झोपड्यांचे नुकसान झाले होते. संबंधित टॉवर विनापरवानगी उभारण्यात आल्याचे तपासात निष्पन्न झाले होते. त्यातून महापालिकेच्या नियंत्रण यंत्रणेची कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते.

सर्वाधिक होर्डिंग्ज के पश्चिममध्ये

होर्डिंगची सर्वाधिक संख्या के पश्चिम विभागात (अंधेरी, जोगेश्वरी आणि विलेपार्ले पश्चिम) तसेच एच पश्चिम विभागात (वांद्रे पश्चिम, खार पश्चिम आणि सांताक्रूझ पश्चिम) असल्याची माहिती सूत्रांनी दिली. जाहिरातींच्या माध्यमातून कंपन्यांचा व्यवसाय तेजीत असताना महापालिकेच्या तिजोरीत मात्र कराची रक्कम जमा होत नसल्याचे चित्र आहे.मोबाईल टॉवर कंपन्यांनी मुंबईतील खासगी इमारती, झोपडपट्ट्या, उड्डाणपूल आणि अन्य ठिकाणी मोबाईल टॉवर उभारले आहेत. या टॉवर उभारायला आवश्यक महापालिका परवानग्या आणि करभरण्याच्या बाबतीत उदासीनता दिसून येत आहे.

कुणाकडून किती येणे

  • मोबाईल टॉवर कंपन्यांकडे १५० कोटी ३८ लाख २७ हजार रुपयांचा मालमत्ता कर थकीत. दंडाची रक्कमही थकीत.

  • जाहिरात कंपन्यांकडे ८२ कोटी ९० लाख रुपयांचा मालमत्ता कर थकीत. दंडही थकवला.

नोटिसांचे काय झाले ?

मालमत्ता कराचे देयक मिळाल्यानंतर ९० दिवसांत कर भरणे बंधनकारक आहे. मुदतीत कर न भरल्यास मागणीपत्र आणि त्यानंतर २१ दिवसांची अंतिम नोटीस देण्यात येते. दहा ते पंधरा वर्षे कर थकवणाऱ्या कंपन्यांनाही नोटीसा पाठवण्यात आल्या. त्यांना कंपन्यांनी केराची टोपली दाखवल्याचे म्हटले जाते.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)