Mumbai : एफडीतील ३० हजार कोटी रुपये गेले कुठे? मोठ्या प्रकल्पासाठी ठेवी मोडल्या - अश्रफ आझमी

मुंबई महापालिकेच्या विविध बँकांमध्ये ठेवी जमा असून ठेवींवर वर्षाला चार हजार कोटी रुपये व्याज मिळते. त्यामुळे २०२१ ते ऑक्टोबर २०२६ पर्यंत प्रत्येक वर्षी सहा हजार कोटी रुपये व्याज धरले तर ठेवीत वाढ होणे अपेक्षित आहे.
Mumbai : एफडीतील ३० हजार कोटी रुपये गेले कुठे? मोठ्या प्रकल्पासाठी ठेवी मोडल्या - अश्रफ आझमी
Mumbai : एफडीतील ३० हजार कोटी रुपये गेले कुठे? मोठ्या प्रकल्पासाठी ठेवी मोडल्या - अश्रफ आझमी
Published on: 

मुंबई : मुंबई महापालिकेच्या विविध बँकांमध्ये ठेवी जमा असून ठेवींवर वर्षाला चार हजार कोटी रुपये व्याज मिळते. त्यामुळे २०२१ ते ऑक्टोबर २०२६ पर्यंत प्रत्येक वर्षी सहा हजार कोटी रुपये व्याज धरले तर ठेवीत वाढ होणे अपेक्षित आहे. मात्र गेल्या सहा वर्षांत व्याजापोटी मिळणारे ३० हजार रुपये गेले कुठे? असा सवाल उपस्थित करत मोठ्या प्रकल्पांसाठी ठेवी मोडीत काढल्याचा दावा काँग्रेसचे गटनेते अश्रफ आझमी यांनी केला आहे.

मुंबई महापालिकेच्या मुदत ठेवींमध्ये गेल्या काही वर्षांत मोठी घट झाल्याने महापालिकेच्या आर्थिक स्थितीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. २०२१ मध्ये सुमारे ९१ हजार कोटी रुपयांच्या मुदत ठेवी असताना आता हा आकडा ७९ हजार कोटींवर आला आहे. तब्बल ११ हजार ८१७ कोटी रुपयांची घट झाल्याचा मुद्दा त्यांनी उपस्थित केला. मात्र २०२१ ते ऑक्टोबर २०२६ पर्यंत ठेवींवर वर्षाला मिळणारे सहा हजार कोटी असे एकूण ३० हजार कोटी रुपयांचे गेले कुठे, असा प्रश्न उपस्थित करत याची श्वेतपत्रिका काढा, अशी मागणी पालिका आयुक्त अश्विनी भिडे यांना पत्र लिहून केल्याचे आझमी यांनी सांगितले.

आता २०२१ ते २०२६ या कालावधीत मिळणारे व्याज लक्षात घेता, ठेवींमध्ये ३० हजार कोटींची वाढ होऊन एकूण ठेवी सुमारे १०० कोटींच्या घरात असायला हव्यात, मग फक्त ७९ हजार ३०४ कोटी रकमेच्या ठेवी का दिसत आहेत, असा सवाल उपस्थित केला जात आहे. काँग्रेसने नेमका हाच मुद्दा उपस्थित करत व्याजापोटी मिळालेले ३० हजार कोटी गेले कुठे, असा प्रश्न करतानाच काँग्रेस गटनेते अश्रफ आझमी यांनी मुदत ठेवींच्या संदर्भात श्वेतपत्रिका काढण्याची मागणी पालिका आयुक्त अश्विनी भिडे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. या संदर्भात उपायुक्त वित्त विभाग देवीदास क्षीरसागर यांना फोनवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)