

मुंबई : मुंबईकरांना सुरक्षित व अखंड पाणीपुरवठा करण्याच्या दृष्टीने पालिकेने आणखी एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. भातसा जलाशयातून मुंबईला होणारा पाणीपुरवठा अधिक सुरक्षित करण्यासाठी पिसे पंपिंग स्टेशन ते पांजरापूर जलशुद्धीकरण केंद्रादरम्यान सुमारे सात किलोमीटर लांबीचा जलबोगदा बांधण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठी अंदाजे दोन हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित असून कामासाठी निविदा प्रसिद्ध केली आहे.
सध्या पिसे पंपिंग स्टेशनमधून भातसा जलाशयाचे पाणी पंप करून पांजरापूर येथे आणले जाते. तेथे जलशुद्धीकरण केल्यानंतर मुंबई-२ आणि मुंबई-३ या मुख्य जलवाहिन्यांद्वारे मुंबईला पाणीपुरवठा केला जातो. मात्र, सध्या पाणी वाहून नेणाऱ्या काही प्रमुख जलवाहिन्या जमिनीच्या वरच्या भागातून जात असल्याने त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न वारंवार उपस्थित होत आहे. जलवाहिनी फुटणे, दुरुस्तीची कामे किंवा नैसर्गिक आपत्तीमुळे पाणीपुरवठा विस्कळीत होण्याचा धोका कायम असतो. पावसाळ्यातही अशा समस्यांमुळे मुंबईकरांना पाणीटंचाईचा सामना करावा लागू शकतो. या पार्श्वभूमीवर पालिकेने भुयारी जलमार्ग उभारण्यावर भर दिला आहे. प्रस्तावित जलबोगदा जमिनीखाली सुमारे ७० ते १०० फुटांवर असेल. त्यामुळे बाह्य हस्तक्षेप, अपघात, अन्य कारणांमुळे जलवाहिनीचे होणारे नुकसान टाळले जाऊ शकेल.
पाणीपुरवठ्याच्या सुरक्षिततेत वाढ होणार
येवई ते कशेळी आणि कशेळी ते मुलुंडदरम्यान सुमारे २१ किलोमीटर लांबीच्या भुयारी जलबोगद्याचे कामही सुरू आहे. त्यापुढील पिसे ते पांजरापूर हा उर्वरित टप्पा पूर्ण झाल्यानंतर मोडकसागर आणि भातसा जलाशयातून मुंबईला होणाऱ्या पाणीपुरवठ्याच्या सुरक्षिततेत वाढ होणार आहे.
भांडुप जलशुद्धीकरण केंद्रात शुद्धीकरण
भातसा जलाशयातून मुंबईला दररोज सुमारे २,०२० दशलक्ष लिटर पाणी मिळते. त्यापैकी सुमारे १,४०० दशलक्ष लिटर पाण्यावर पांजरापूर जलशुद्धीकरण केंद्रात प्रक्रिया केली जाते. हे पाणी येवई जलाशयामार्गे मुंबई-२ आणि मुंबई-३ या दोन प्रमुख जलवाहिन्यांद्वारे मुंबईत आणले जाते. उर्वरित सुमारे ६२० दशलक्ष लिटर पाणी येवई येथून वैतरणा आणि अप्पर वैतरणा जलवाहिन्यांद्वारे भांडुप जलशुद्धीकरण केंद्रात नेऊन शुद्ध केले जाते.
...पाणीपुरवठा करणे शक्य होईल!
जलवाहिन्यांसोबतच पाणीपुरवठ्यासाठी पर्यायी व्यवस्था उपलब्ध होणार आहे. एखाद्या जलवाहिनीमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यास दुसऱ्या मार्गाचा वापर करून पाणीपुरवठा सुरू ठेवणे शक्य होईल. त्यामुळे मुंबईच्या पाणीपुरवठा व्यवस्थेला अधिक बळकटी मिळण्याची अपेक्षा आहे.