
मुंबई : मागील कित्येक महिन्यांपासून बंद असलेली आपली चिकित्सा योजना येत्या १ ऑगस्टपासून सुरू करण्याचा निर्णय पालिकेच्या आरोग्य विभागाने घेतला आहे. या योजनेच्या माध्यमातून विविध स्वरूपाच्या रक्त चाचण्या अत्यल्प दरात पालिका रुग्णालयात करता येणार आहे. तसेच या रक्त चाचणीचा अहवाल नागरिकांना व्हॉट्सॲपवर उपलब्ध होणार आहे.
सदर योजना सुरुवातीला १०० आरोग्य संस्थांमध्ये राबविण्यात येणार आहे, तर महानगरपालिकेच्या सर्व दवाखान्यांमध्ये १५ ऑगस्टपर्यंत ही सेवा सुरू करण्याचे उद्दिष्ट असल्याचे पालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीने सांगण्यात आले.
आपली चिकित्सा योजना मुंबई महानगरपालिकेची उपनगरीय रुग्णालये, दवाखाने, आपला दवाखाना, पॉलिक्लिनिक, प्रसूतिगृहे तसेच विलेपार्ले स्थित डॉ. रू. न. कूपर रुग्णालय व जोगेश्वरी स्थित हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा केअर महानगरपालिका रुग्णालयामध्ये सुरू करण्यात येत आहे. 'लाइफनिटी हेल्थ' या संस्थेची सेवा पुरवठादार म्हणून निवड करण्यात आली आहे.
'आपली चिकित्सा' योजना अंतर्गत महाराष्ट्र राज्य शासनाच्या आरोग्य संस्थांमध्ये उपलब्ध असणाऱ्या ६६ मूलभूत तपासण्या व १७ प्रगत अशा ८३ तपासण्यांचा समावेश करण्यात आला आहे.
आजपासून होणार कार्यान्वित
‘आपली चिकित्सा’ योजनेद्वारे मुंबईतील नागरिकांना नाममात्र दरात रक्त चाचणी सुविधा उपलब्ध करून दिली जात होती. मात्र, काही महिन्यांपूर्वी ही योजना बंद पडल्यामुळे नागरिकांच्या खिशाला मोठी कात्री लागत होती. खासगी प्रयोगशाळेत रुग्णांची अक्षरशः लूट होत होती. रुग्णांच्या वाढत्या मागणीमुळे पालिका येत्या १ ऑगस्टपासून ही योजना नव्याने सुरू करत आहे.
या ठिकाणी सुरू होणार सेवा
-१६ उपनगरीय रुग्णालये
-३० प्रसूतिगृहे
-५ विशेष रुग्णालये
-डॉ. आर. एन. कूपर रुग्णालय
-एचएचबीटी ट्रॉमा रुग्णालय
-विभाग ‘ए’ ते ‘ई’मधील सर्व महानगरपालिका दवाखाने
माहितीचे संकलन, व्यवस्थापन करणार
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या धोरणांतर्गत रुग्णांना रक्त चाचणी अहवाल व्हॉट्सॲपद्वारे उपलब्ध होऊ शकतील, अशी व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच, आरोग्य माहिती व्यवस्थापन प्रणालीद्वारे सर्व रुग्णांच्या माहितीचे संकलन, व्यवस्थापन करण्यात येणार आहे.