

मुंबई : दिवाळीच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील रस्ते आणि पदपथांवर विनापरवाना फटाके विक्री करणाऱ्यांविरुद्ध मुंबई महानगरपालिकेने कठोर कारवाईचे आदेश दिले आहेत. दिवाळीसारख्या सणांच्या काळात सार्वजनिक ठिकाणी अनधिकृतपणे फटाक्यांची विक्री करणाऱ्यांवर बृहन्मुंबई महानगरपालिका अधिनियमाच्या कलम ३१४ (क) अन्वये अतिक्रमण निर्मूलनाची कारवाई करण्याचे निर्देश वरिष्ठ निरीक्षकांना देण्यात आले आहेत. तसेच अधिकृत परवानाधारकांकडे फटाक्यांचा अतिरिक्त साठा आढळल्यास त्यांच्यावरही कारवाई केली जाणार आहे.
महानगरपालिकेच्या रस्त्यांवर आणि पदपथांवर फटाके विक्रीसाठी अनधिकृतपणे दुकाने किंवा स्टॉल उभारले जात असल्यास संबंधित विक्रेत्यांविरुद्ध तत्काळ कठोर कारवाई करण्याचे निर्देश अतिक्रमण व अनुज्ञापन विभागाच्या वरिष्ठ निरीक्षकांना देण्यात आले आहेत.
सार्वजनिक रस्ते आणि पदपथांवरील अतिक्रमण हटवून पादचाऱ्यांना मोकळा मार्ग उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने ही कारवाई महत्त्वाची मानली जात आहे.
दररोजच्या कारवाईचा अहवाल बंधनकारक
ही विशेष कारवाई २६ ऑक्टोबर ते ११ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत राबविण्यात येणार आहे. या काळात अनधिकृत फटाके विक्रेत्यांवर तसेच नियमबाह्य साठा आढळलेल्या परवानाधारकांवर केलेल्या कारवाईचा अहवाल संबंधित कार्यालयात दररोज सादर करावा लागणार आहे. तसेच या अहवालांच्या आधारे उप आयुक्त (विशेष) आणि अतिरिक्त आयुक्त (पश्चिम उपनगरे) यांना दैनंदिन माहिती सादर केली जाणार आहे.
परवानाधारकांच्या साठ्यावरही नजर
केवळ विनापरवाना विक्रेत्यांपुरतीच ही मोहीम मर्यादित नसून, अधिकृत परवानाधारक फटाके विक्रेत्यांकडील साठ्याचीही तपासणी केली जाणार आहे. परवानगीपेक्षा अतिरिक्त फटाक्यांचा साठा आढळल्यास संबंधितांवर बृहन्मुंबई महानगरपालिका अधिनियमाच्या कलम ३९४ अन्वये योग्य ती कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे परवानाधारक विक्रेत्यांनाही नियमांचे पालन करणे बंधनकारक राहणार आहे.