...अन्यथा कंत्राटदाराला बाहेरचा रस्ता, अतिरिक्त आयुक्तांचा इशारा; संबंधित यंत्रणांना दिले 'हे' सक्त आदेश

अपूर्ण रस्ते कामासाठी दुसऱ्या कंत्राटदाराची नियुक्ती करण्यात यावी आणि रस्ते कामाचा खर्च आधीच्या कंत्राटदारांकडून वसूल करावा आणि दंडही आकारा,
...अन्यथा कंत्राटदाराला बाहेरचा रस्ता, अतिरिक्त आयुक्तांचा इशारा; संबंधित यंत्रणांना दिले 'हे' सक्त आदेश

मुंबई : मुंबईत रस्ता कामे सध्या जोरात सुरू असून ३१ मेपर्यंत ती कामे पूर्ण करणे बंधनकारक आहे. तसेच ७ जूनपर्यंत रस्ते वाहतूक सुरळीत होणे अपेक्षित आहे. रस्तेकामांत दिरंगाई, गुणवत्तेशी तडजोड केली जाणार नाही. नियोजित वेळेत काम पूर्ण न करणाऱ्या कंत्राटदारांना बाहेरचा रस्ता दाखवण्यात येईल, असा इशारा मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर यांनी दिला आहे. दरम्यान, अपूर्ण रस्ते कामासाठी दुसऱ्या कंत्राटदाराची नियुक्ती करण्यात यावी आणि रस्ते कामाचा खर्च आधीच्या कंत्राटदारांकडून वसूल करावा आणि दंडही आकारा, असे सक्त आदेश त्यांनी दिले आहेत.

मुंबईत ठिकठिकाणी रस्ते बांधणी व दुरुस्ती आदी कामे वेगाने पूर्ण केली जात आहेत. पालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. भूषण गगराणी यांनी रस्ते कामांच्या प्रगतीचा काही दिवसांपूर्वी आढावा घेतला होता. पावसाळा सुरू होण्यापूर्वी रस्त्यांची सर्व कामे पूर्ण करावीत, रस्ते वाहतूक योग्य करावेत, पावसाळ्यात कोणत्याही रस्त्याचे काम सुरू ठेवून नागरिकांची गैरसोय करू नका, असे निर्देश गगराणी यांनी दिले होते.

रस्तेकामाशी संबंधित असलेल्या विविध विभागांनी आपांपसात योग्य समन्वय ठेवून वेळेत आणि दर्जेदार पद्धतीने कामे होण्याकडे लक्ष द्यावे. पावसाळ्यात नागरिकांना त्रास होऊ नये, विशेषत: अपूर्ण रस्तेकामांमुळे कोणतीही जीवितहानी होऊ नये, यादृष्टीने सध्या सुरू असलेल्या रस्त्यांची कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण होणे गरजेचे आहे. यासाठी मंगळवार २८ मेपर्यंत रस्ते कामांचे मूल्यमापन करावे. ज्या रस्त्यांच्या कामांची प्रगती समाधानकारक आढळून येणार नाही, त्याच्याशी संबंधित कंत्राटदारांना नोटीस जारी करावी. तसेच ३१ मेपर्यंत रस्त्यांची कामे पूर्ण न केल्यास आणि ७ जून २०२४ पर्यंत रस्तेवाहतूक योग्य स्थितीत न आणल्यास त्यांच्याकडून ते काम काढून घ्यावे. त्याचप्रमाणे संबंधित काम अन्य कंत्राटदाराकडून पूर्ण करून घ्यावे. कारवाईची ही कार्यपद्धती मुंबईत सुरू असलेल्या सर्व रस्ते कामांसाठी लागू असेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

पालिका आयुक्तांच्या सूचनेनुसार, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) बांगर यांनी ठिकठिकाणी रस्तेकामांची पाहणी केली. आर. दक्षिण आणि आर. मध्य विभागातील रस्त्यांच्या कामांची नुकतीच पाहणी करून बांगर यांनी आढावा घेतला, त्यावेळी त्यांनी संबंधितांना विविध निर्देश दिले. या पाहणी दौऱ्यात उपआयुक्त (पायाभूत सुविधा) उल्हास महाले, सहाय्यक आयुक्त (आर मध्य) संध्या नांदेडकर, प्रमुख अभियंता (रस्ते) मनीष पटेल यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

राडारोडा उचला!

दरम्यान, पावसाळ्यात रस्त्यांवर खड्डे आढळता कामा नये. त्यामुळे, दिसेल तो खड्डा तत्काळ बुजवावा तसेच रस्त्यांच्या कडेला असलेला राडारोडा तत्काळ उचलून घ्यावा, अशा सूचनाही बांगर यांनी यावेळी दिल्या.

logo
marathi.freepressjournal.in