

मुंबई : मुंबई प्रदूषणमुक्त करण्यासाठी बृहन्मुंबई महापालिका प्रयत्नशील आहे. मात्र बांधकाम ठिकाणी धुळीचे कण पसरत असल्याने हवेतील गुणवत्ता खालावत आहे. अखेर प्रदूषणमुक्त मुंबईसाठी मुंबई महापालिकेने १ ते ३१ ऑक्टोबरदरम्यान ४४ बांधकामांना स्टॉप वर्क नोटीस बजावली असून ४२८ बांधकामांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.
मुंबईच्या हवेतील गुणवत्ता खालावली असून प्रदूषणात वाढ झाली आहे. यामुळे मुंबईकरांच्या आरोग्यावर परिणाम होण्याचा धोका अधिक आहे. त्यामुळे पालिका प्रशासनाने सुधारण्यासह प्रदूषण रोखण्यासाठी बांधकाम ठिकाणी नियमावली जारी केली आहे. मात्र बांधकाम ठिकाणी काळजी न घेतल्याने हवेचे प्रदूषण वाढत आहे. पालिकेच्या मार्गदर्शक सुचनेनुसार हवेच्या गुणवत्तेवर होणारा परिणाम कमी करण्यासाठी आवश्यक असलेल्या अनेक उपाययोजनांचा करणे बंधनकारक केले आहे.
बांधकाम ठिकाणी स्प्रिकलर उभारणे, ३५ फुट उंच पडदे लावणे, बांधकाम ठिकाणी हवेची गुणवत्ता तपासणीसाठी सेन्सर्स बसवणे आदी २८ नियम बंधनकारक केले आहे. मात्र अनेक बांधकाम ठिकाणी नियमांचे पालन होत नसल्याचे निदर्शनास आल्याने आधी कारणे दाखवा नोटिशीनंतरही सुधारणा न केल्यास स्टॉप वर्क नोटीस बजावण्यात येते, असे पालिकेच्या पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाकडून सांगण्यात आले.
एन. विभागात सर्वाधिक नोटिसा
हवेची गुणवत्ता खालावत असून प्रदूषणास कारणीभूत ठरणाऱ्या सर्वाधिक १०५ नोटिसा एन. विभागात बजावण्यात आल्या आहेत. त्याखालोखाल टी. विभागात ५२, आर-दक्षिण विभागात २२, एच-पूर्व विभागात १९ आणि पी-पूर्व विभागात १५ नोटिसा देण्यात आल्या आहेत. जी-उत्तर विभागात २०, आर-मध्य विभागात २२, जी दक्षिण ४८, एच. पूर्व १९ नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.