

मुंबई : दीपावली २०२६ निमित्त मुंबई महापालिकेतील आशा स्वयंसेविकांबाबत महापौर रितू तावडे यांनी महत्त्वपूर्ण आणि संवेदनशील निर्णय घेतला आहे. महानगरपालिकेच्या अखत्यारीतील १,४६१ आशा स्वयंसेविकांना पहिल्यांदाच प्रत्येकी ५,००० रुपये भाऊबीज भेट जाहीर केल्यानंतर, आता राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान अंतर्गत महापालिकेसाठी कार्यरत असलेल्या ७१९ आशा स्वयंसेविकांचाही यामध्ये समावेश करण्यात आला आहे. यामुळे मुंबईत आरोग्य सेवेत कार्यरत असलेल्या एकूण २,१८० आशा स्वयंसेविकांना प्रथमच ५,००० रुपयांचे दीपावली सानुग्रह अनुदान मिळणार आहे.
पालिकेच्या १,४६१ आशा सेविकांना भाऊबीज भेट जाहीर झाली होती. याच धर्तीवर राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियानातील आशा सेविकांसाठी महापौरांनी हा निर्णय घेतला.
पालिकेने घेतली दखल
महानगरपालिकेचे नियमित अधिकारी व कर्मचाऱ्यांप्रमाणेच जनसामान्यांशी थेट जोडल्या गेलेल्या इतर सर्व घटकांच्या कामाचीही महापालिकेने यथोचित दखल घेतली आहे. या निर्णयानुसार महापालिकेतील २,३९३ सामाजिक आरोग्य स्वयंसेविकांना (सीएचव्ही) प्रत्येकी १४,००० रुपये, तर २,३६० बालवाडी शिक्षिका आणि मदतनिसांना प्रत्येकी ७,००० रुपयांची भाऊबीज भेट दिली जाणार आहे.