

मुंबई : मुंबई महापालिकेच्या जुन्या इमारतींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. तब्बल ३० ते ३५ वर्षांपूर्वी बांधण्यात आलेल्या तसेच त्यापेक्षा जुन्या इमारतींची संरचनात्मक अवस्था खराब होत असल्याने त्यांच्या मोठ्या दुरुस्ती आणि पुनर्बांधणीसाठीआता ८५ खासगी तज्ज्ञ सल्लागारांची मदत घेण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे.
विशेष म्हणजे मुंबई महापालिकेकडे स्वतःचे पुरेसे तांत्रिक कर्मचारी, नॉन डिस्ट्रक्टिव्ह टेस्टिंग (एनडीटी) चाचणी प्रयोगशाळा आणि आवश्यक सखोल तांत्रिक ज्ञान उपलब्ध नसल्याची कबुली प्रशासनाने दिली आहे. त्यामुळे महापालिकेच्या हजारो कोटींच्या मालमत्तांची देखभाल करण्यासाठी बाह्य संस्थांवर अवलंबून राहण्याची वेळ प्रशासनावर आली आहे.
महापालिकेची रुग्णालये, प्रसूतिगृहे, बाजारपेठा, अग्निशमन केंद्रे आणि कर्मचारी निवासस्थाने अशा अनेक इमारती ३० ते ३५ वर्षांहून अधिक जुन्या आहेत. वातावरणातील बदल, पावसाचे पाणी आणि प्रबलित काँक्रिटमधील पोलादाला गंज लागल्यामुळे इमारतींची झीज होत आहे. विभागीय पातळीवर केली जाणारी नियमित देखभाल या इमारतींचा ऱ्हास रोखण्यासाठी पुरेशी ठरत नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
जुन्या इमारतींची संरचनात्मक स्थिती तपासण्यासाठी विशेष सर्वेक्षण आणि विविध 'एनडीटी' चाचण्या करणे आवश्यक आहे. त्यानंतर दुरुस्तीचा खर्च आणि इमारतीचे उर्वरित आयुष्य यांचा अभ्यास करून दुरुस्ती करायची की पुनर्बांधणी, याचा निर्णय घेतला जाणार आहे. दुरुस्तीचा खर्च अधिक असल्यास पुनर्बांधणीचा पर्याय स्वीकारला जाईल.
सल्लागारांना केवळ तपासणीपुरते काम न देता स्थळ निरीक्षण, संरचनात्मक स्थिरतेचे विश्लेषण, नवीन इमारतींचे आराखडे, दुरुस्तीची पद्धत, अंदाजपत्रक, निविदा प्रपत्र आणि प्रत्यक्ष कामासाठी कार्यकारी आराखडा तयार करण्याची जबाबदारी दिली जाणार आहे. काम पूर्ण झाल्यानंतर इमारतीचे संरचनात्मक स्थिरता प्रमाणपत्र देणेही बंधनकारक असेल.
यापूर्वी ६३ संरचनात्मक सल्लागार
यापूर्वी महापालिकेच्या तालिकेवर ६३ संरचनात्मक सल्लागार होते. त्यांची नियुक्ती ७ मार्च २०२२ रोजी तीन वर्षांसाठी करण्यात आली होती. त्यानंतर मुदतवाढ देण्यात आली. मात्र, नव्या तालिकेची प्रक्रिया लांबल्याने जुन्या सल्लागारांची मुदत संपल्यानंतरही त्यांच्या सेवांचा आधार घ्यावा लागला. आता नव्याने सल्लागारांची नियुक्ती करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे.
सल्लागारांवर या कामांची जबाबदारी
इमारतींचे स्थळ निरीक्षण आणि सर्वेक्षण
जुन्या इमारतींची संरचनात्मक स्थिरता तपासणे
आवश्यकतेनुसार 'एनडीटी' चाचण्या करणे
दुरुस्ती अथवा पुनर्बांधणीची पद्धत निश्चित करणे
नवीन इमारतींचे संरचनात्मक आराखडे तयार करणे
अंदाजपत्रक आणि निविदा प्रपत्र तयार करणे
प्रत्यक्ष कामासाठी कार्यकारी आराखडा तयार करणे
विद्युत, यांत्रिकी, अग्निशमन आदी समन्वय साधणे
काम पूर्ण झाल्यानंतर स्थिरता प्रमाणपत्र देणे