

अवधूत खराडे व देवश्री भुजबळ/मुंबई
लग्नाचे आमिष दाखवून एका महिला वास्तुविशारदावर (आर्किटेक्ट) वारंवार बलात्कार केल्याप्रकरणी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या के-पूर्व विभागाचे सहाय्यक आयुक्त नितीन शुक्ला यांना पार्कसाईट पोलिसांनी सोमवारी अटक केली. या घटनेमुळे पालिका वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
शुक्ला यांना तातडीने सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले असून त्यांच्या विभागाचा पदभार तात्पुरत्या स्वरूपात कार्यकारी अभियंत्याकडे सोपवण्यात आला असल्याचे पालिका अधिकाऱ्यांनी सांगितले. न्यायालयाच्या सुनावणीनंतर त्यांच्या निलंबनाबाबत निर्णय घेतला जाईल.
तक्रारदार महिला एका खासगी कंपनीत वास्तुविशारद म्हणून कार्यरत आहे. तीन वर्षांपूर्वी कामाच्या निमित्ताने तिची शुक्ला यांच्याशी ओळख झाली होती. या ओळखीचे रूपांतर मैत्रीत झाले आणि शुक्ला यांनी तिला लग्नाचे आमिष दाखवले. पीडित महिलेचा जबाब, प्राथमिक चौकशी आणि पुराव्यांच्या आधारे शुक्ला यांना सोमवारी चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. त्यानंतर त्यांच्यावर ‘भारतीय न्याय संहिता’ (बीएनएस) अंतर्गत गुन्हा दाखल करून अटक करण्यात आल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष घाटेकर यांनी दिली.
शुक्ला यांना मंगळवारी न्यायालयात हजर केले जाणार आहे. के-पूर्व प्रभागाचे सहाय्यक आयुक्त म्हणून कार्यरत असलेले शुक्ला यापूर्वी एफ-उत्तर प्रभागातील कारवाईमुळे चर्चेत आले होते.
लग्न झाल्याची बाब पीडितेपासून लपवली
लग्नाच्या बहाण्याने शुक्ला यांनी दीर्घकाळ आपले लैंगिक शोषण केल्याचा आरोप पीडित महिलेने केला आहे. शुक्ला यांचे सात वर्षांपूर्वीच लग्न झाले होते, मात्र त्यांनी ही बाब पीडितेपासून लपवून ठेवली होती. ही फसवणूक लक्षात आल्यानंतर महिलेने २६ एप्रिल रोजी पार्कसाईट पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.