

मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या चार प्रमुख रुग्णालये आणि १६ उपनगरीय रुग्णालये याठिकाणी जन्माला येणाऱ्या बालकांना रुग्णालयाच्या ठिकाणीच जन्माचा दाखला उपलब्ध करून देण्यात येणार आहे. पालिकेच्या वैद्यकीय महाविद्यालये आणि रुग्णालयाच्या परिसरात घडणाऱ्या जन्म आणि मृत्यू घटनांची नोंदणी संबंधित संस्थांच्या अधिष्ठाता आणि वैद्यकीय अधीक्षक यांच्या नियंत्रणाखाली करण्यात येणार आहे. यामुळे जन्म आणि मृत्यू नोंदणी प्रक्रिया अधिक सुलभ आणि जलद होईल. सेवा हमी कायद्यान्वये महानगरपालिका रुग्णालयात जन्माला आलेल्या बालकांचा अवघ्या तीन दिवसांत दाखला उपलब्ध होणार आहे.
महानगरपालिकेने जन्म आणि मृत्यू नोंदीसाठी प्रमुख रुग्णालये आणि उपनगरीय रुग्णालये याठिकाणी संबंधित संस्थांच्या अधिष्ठाता आणि वैद्यकीय अधीक्षकांना अधिकार देण्याची मागणी राज्य सरकारकडे केली होती. राज्य सरकारने भारताचे रजिस्ट्रार जनरल यांच्याकडे ही विनंती मांडली होती. भारताचे रजिस्ट्रार जनरल यांनी संपूर्ण प्रक्रियेला मंजूरी दिली आहे. त्यामुळे प्रक्रियेचे विकेंद्रीकरण करणे शक्य झाले आहे.
संपूर्ण प्रक्रिया सुलभ होणार
महापालिकेच्या प्रमुख रुग्णालये आणि उपनगरीय रुग्णालयाच्या ठिकाणी जन्माला येणाऱ्या नवजात बालकांच्या जन्म नोंदीच्या प्रक्रियेसाठी पालकांना विभाग कार्यालयात जाण्याची आता गरज नाही. नागरिकांच्या वेळेची बचत व्हावी तसेच संपूर्ण प्रक्रिया सुलभ व्हावी, या उद्देशाने जन्म आणि मृत्यूच्या नोंदणीसाठी आवश्यक लॉगिन आयडी या रुग्णालयांना देण्यात आले आहेत, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त (शहर) प्राजक्ता लवंगारे-वर्मा यांनी दिली.