

मुंबई : मुंबईतील सार्वजनिक शिक्षण व्यवस्थेचा दर्जा उंचावण्याच्या उद्देशाने बृहन्मुंबई महापालिकेने सन २०२०-२१ पासून टप्प्याटप्प्याने १९ केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (सीबीएसई) संलग्न शाळा सुरू केल्या आहेत. या उपक्रमाचा विस्तार करत शैक्षणिक वर्ष २०२६-२७ पासून आणखी पाच नवीन ‘सीबीएसई’ अभ्यासक्रमाच्या शाळा सुरू करण्यात येत आहेत. या शाळांमधील नर्सरी ते इयत्ता पहिलीपर्यंतच्या प्रवेश प्रक्रियेला बुधवार, १ जुलैपासून सुरुवात होणार आहे. मालाड (पश्चिम), मालाड (पूर्व), सांताक्रूझ (पूर्व), कांदिवली (पूर्व) आणि ग्रँट रोड (पश्चिम) येथे या शाळा सुरू करण्यात येत आहेत.
बृहन्मुंबई महापालिकेकडून मराठी, हिंदी, उर्दू, इंग्रजी, गुजराती, तामिळ, तेलगू, कन्नड या आठ भाषांमध्ये शिक्षण दिले जाते. महापालिकेच्या १,११८ प्राथमिक व माध्यमिक शाळा आहेत. या शाळांमध्ये ३ लाख १० हजार ४२६ विद्यार्थी शिक्षण घेतात. यासाठी ८ हजार ६३० शिक्षक आहेत. बृहन्मुंबई महापालिकेच्या शिक्षण विभागाकडून नव्याने सुरुवात करण्यात येत असलेल्या पाच ‘सीबीएसई’ अभ्यासक्रमाच्या शाळांची आता यात भर पडली आहे. या शाळांसाठी १ ते १२ जुलै २०२६ या कालावधीत केवळ ऑनलाइन पद्धतीने प्रवेश अर्ज स्वीकारले जाणार आहेत.
महापालिकेने सर्व आर्थिक व सामाजिक स्तरांतील विद्यार्थ्यांना राष्ट्रीय स्तरावरील दर्जेदार शिक्षण पूर्णपणे मोफत उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने पाच नवीन 'मुंबई पब्लिक स्कूल (सीबीएसई)' सुरू केल्या आहेत. मुंबई पब्लिक स्कूल, लिबर्टी गार्डन, मालाड (पश्चिम), मुंबई पब्लिक स्कूल-गोविंद नगर, मालाड (पूर्व), मुंबई पब्लिक स्कूल- वाकोला, सांताक्रूझ (पूर्व), मुंबई पब्लिक स्कूल -ठाकूर व्हिलेज, कांदिवली (पूर्व) आणि मुंबई पब्लिक स्कूल -जगन्नाथ शंकरशेठ, ग्रँट रोड (पश्चिम) येथे या शाळा सुरू करण्यात येत आहेत.
या शाळांमध्ये नर्सरी, ज्युनिअर केजी, सिनिअर केजी आणि इयत्ता पहिलीसाठी प्रवेश दिला जाणार आहे. खासगी शाळांची शुल्करचना परवडत नसलेल्या सर्वसामान्य कुटुंबांतील विद्यार्थ्यांना कोणतेही शुल्क न आकारता दर्जेदार शिक्षण उपलब्ध करून देण्याचा महापालिकेचा प्रयत्न आहे.
असा घ्या प्रवेश
पालकांनी १ जुलै ते १२ जुलै या कालावधीत आपल्या पाल्याचा अर्ज सादर करायचा आहे. यासाठी पालक पालिकेच्या https://www.mcgm.gov.in/irj/portal/anonymous/qlSchool या संकेतस्थळावर थेट ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरू शकतात. ऑनलाईन अर्ज भरताना काही अडचण आल्यास पालक संबंधित शाळेच्या मदत केंद्राला प्रत्यक्ष भेट देऊन मदत मिळवू शकतात.