काम सुरू करताच क्लीन अप मार्शलच्या दोन संस्थांनी गाशा गुंडाळला; कामात अडथळा येत असल्याचे कारण देत घेतली माघार

शहरात घाण करणाऱ्यांवर कारवाईसाठी नियुक्त केलेल्या क्लीनअप मार्शल संस्थांपैकी दोन संस्थांनी काम सुरू करताच माघार घेतली आहे.
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

मुंबई : शहरात घाण करणाऱ्यांवर कारवाईसाठी नियुक्त केलेल्या क्लीनअप मार्शल संस्थांपैकी दोन संस्थांनी काम सुरू करताच माघार घेतली आहे. कामात अडथळा येत असल्याचे कारण देत अंधेरी पश्चिम व मालाडमधील दोन संस्थांनी गाशा गुंडाळला आहे. दरम्यान, सध्या कार्यरत संस्थांपैकी दोन संस्थांची या ठिकाणी नियुक्ती करण्यात येणार असून तसा प्रस्ताव मंजुरीसाठी पालिकेकडे पाठवल्याचे घनकचरा व्यवस्थापन विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

कोरोना काळात तोंडावर मास्क न लावणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यासाठी क्लीनअप मार्शलची नियुक्ती केली होती. मात्र क्लीनअप मार्शल दंडात्मक कारवाईच्या नावाखाली जबरदस्ती वसुली करत असल्याच्या तक्रारी पालिका प्रशासन व महापौर कार्यालयात प्राप्त झाल्या होत्या. त्यातच आधीच्या संस्थांचे कंत्राट संपुष्टात आल्याने कंत्राटास मुदतवाढ न देता कंत्राट रद्द करण्यात आले. मात्र अडीच वर्षांनंतर मुंबईच्या रस्त्यांवर क्लीनअप मार्शलची नियुक्ती केली. रस्त्यांवर घाण करणे, थुंकणे यांच्यावर दंडात्मक कारवाईसाठी पालिकेच्या २० वॉर्डात क्लीनअप मार्शल तैनात करण्यात आले. क्लीनअप मार्शल तैनात केल्यानंतर घाण करणाऱ्या १२ हजार जणांवर दंडात्मक कारवाई करत ३६ लाख ३८ हजार ३१३ रुपये दंड वसूल केला. पालिकेच्या ए वॉर्डात ५ हजार ३५१ जणांवर कारवाई करत सर्वाधिक ११ लाख ५१ हजार रुपये दंड वसूल करण्यात आल्याचे पालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाकडून सांगण्यात आले.

२५ वॉर्डांत ७२० क्लीनअप मार्शलची नजर

मुंबई पालिकेच्या २५ वॉर्डांत प्रत्येकी ३० 'क्लीनअप मार्शल' याप्रमाणे ७२० मार्शलची नियुक्ती केली जाणार आहे. सध्या २० वॉर्डांत क्लीनअप मार्शलची नियुक्ती करण्यात आली आहे.

logo
marathi.freepressjournal.in