

मुंबई : पवई उच्चस्तरीय जलाशय क्रमांक १ ते सहार गावदरम्यान मुख्य जलवाहिन्यांवरील गळती दुरुस्तीचे काम मुंबई महापालिकेने निर्धारित वेळेत पूर्ण केले आहे. तब्बल २३ ठिकाणच्या गळती रोखण्यात पालिकेच्या जल अभियंता विभागाला यश आले असून, त्यामुळे जी उत्तर, के दक्षिण, के उत्तर, एच पूर्व, एन आणि एस या सहा विभागांतील बाधित पाणीपुरवठा पूर्ववत झाला आहे. मात्र, दुरुस्तीच्या कामानंतर पुढील तीन ते चार दिवस काही भागांत कमी दाबाने आणि गढूळ पाणीपुरवठा होण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी पाणी गाळून आणि उकळून प्यावे, असे आवाहन पालिकेने केले आहे.
पवई ते सहारदरम्यानच्या मुख्य जलवाहिन्यांमधील गळती रोखण्यासाठी गुरुवार, २६ नोव्हेंबर रोजी सकाळी ९ वाजता दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले होते. हे काम शुक्रवार, २७ नोव्हेंबर रोजी सकाळी ९ वाजता पूर्ण करण्यात आले. विशेष म्हणजे, जलवाहिन्यांमधील तांत्रिक अडचणींमुळे बाहेरून गळती दुरुस्त करणे शक्य नव्हते. त्यामुळे जलवाहिन्यांच्या आत प्रवेश करून दुरुस्ती पथकाने केली.
१४ ठिकाणी आढळली होती गळती
पवई ते सहारदरम्यानच्या १,८०० आणि २,४०० मिलिमीटर व्यासाच्या मोठ्या जलवाहिन्यांवर एकूण १४ ठिकाणी गळती आढळली होती. या सर्व गळती जलवाहिन्यांच्या आत जाऊन पूर्णपणे बंद करण्यात आल्या. तसेच ६०० मिलिमीटर व्यासाच्या जलवाहिनीवरील ९ ठिकाणच्या गळतीही रोखण्यात आल्या. अशा प्रकारे एकूण २३ ठिकाणच्या गळती दुरुस्त करण्यात पालिकेला यश आले.
खबरदारी घ्यावी !
या संपूर्ण मोहिमेसाठी जल अभियंता विभागाचे २० अभियंते आणि १८० कामगार असे एकूण २०० कर्मचारी २४ तास अहोरात्र कार्यरत होते. जलवाहिन्यांमधील गळती रोखल्यामुळे पाण्याचा दाब सुधारण्यास मदत होणार असून, संबंधित विभागांतील पाणीपुरवठा अधिक सुरळीत होण्याची अपेक्षा आहे. तथापि, दुरुस्तीनंतर जलवाहिन्यांमधील पाणी स्थिर होण्यास काही दिवस लागणार असल्याने नागरिकांनी खबरदारी घ्यावी, असे आवाहन पालिकेने केले आहे.