

मुंबई : मुंबई महापालिकेत भाजप महायुतीची सत्ता स्थापन होताच बेकायदा फेरीवाले रडारवर आले आहेत. जानेवारी ते मे २०२६ या पाच महिन्यांच्या कालावधीत शहरातील बेकायदा फेरीवाल्यांविरोधात मोठी मोहीम राबवत एकूण ५५ हजार ८६१ कारवाई केली आहे. यात सर्वाधिक घाटकोपर मध्ये ४,६७४ बेकायदा फेरीवाल्यांवर कारवाई करण्यात आली. या कारवाईतून ७५ लाख १५ हजार २६० रुपयांचा महसूल महापालिकेला प्राप्त झाला आहे.
बांगलादेशी रोहिंगे फेरीवाले भाजप महायुतीच्या रडारवर आले असून बेकायदा फेरीवाल्यांविरोधात कारवाईचा बडगा उगारण्यात येत आहे. मुंबईतील पदपथांवरील अनधिकृत फेरीवाले तसेच इतर अतिक्रमणे यामुळे पादचाऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागतो.
गर्दीच्या रेल्वे स्थानक परिसरात अनधिकृत फेरीवाल्यांनी फूटपाथ, रस्ते अडवल्याने प्रवाशांना कसरत करत चालावे लागते. त्यामुळे मुंबई महापालिकेच्यावतीने अनधिकृत फेरीवाले व पदपथांवरील अतिक्रमणे यावर केली जाणारी कारवाई अधिक तीव्र करण्याची सूचना उच्च न्यायालयाने केली आहे. त्यानुसार, अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाईचा धडाका पालिकेने सुरू केला आहे.
अशी झाली कारवाई
कालावधी - जानेवारी ते मे २०२६
एकूण कारवाई - ५५,८६१
एकूण महसूल - ७५,१५,२६०
सर्वाधिक कारवाई : एन विभाग – ४,६७४
दुसरा क्रमांक : पी/दक्षिण – ४,००३
तिसरा क्रमांक : आर/मध्य – ३,९३७
सर्वाधिक महसूल : एन विभाग – ६,११,०००
फेरीवाल्यांबरोबर बेवारस वाहनांवरही कारवाई
मागील पाच महिन्यांत ५५ हजार ८६१ फेरीवाल्यांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. दरम्यान, अत्यंत वर्दळीच्या परिसरांत अधिक नियोजनपूर्वक व मुंबई पोलिसांच्या सहकार्याने कारवाई करावी, रस्त्यांच्या कडेला बेवारस वाहने हटवावीत, नागरिकांना व वाहतुकीला अडथळा होणार नाही, असे निर्देश महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी दिले आहेत.
रस्ते, पदपथ मोकळे करणार
गेल्या पाच महिन्यांत महापालिकेच्या कारवाईत सर्वाधिक लक्ष्य फेरीवाले, खाद्यपदार्थ विक्रेते, हातगाड्या, टेबल स्टॉल आणि इतर अनधिकृत व्यावसायिकांवर केंद्रित करण्यात आले. शहरातील रस्ते आणि पदपथ मोकळे ठेवण्याच्या उद्देशाने ही मोहीम सातत्याने राबवण्यात येत असल्याचे पालिकेच्या अहवालातून स्पष्ट झाले आहे.