

एफपीजे न्यूज सर्व्हिस/मुंबई
अंधेरी (पश्चिम) येथील 'समर्थनगर कॉम्प्लेक्स हाऊसिंग लोखंडवाला को-ऑपरेटिव्ह सोसायटीज असोसिएशन' ने त्यांच्या 'सेलिब्रेशन स्पोर्ट्स क्लब'मधील काही कथित बांधकामांवर अनधिकृत बृहन्मुंबई महानगरपालिकेने केलेल्या तोडक कारवाईचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे. असोसिएशनचे सचिव हेमंत नायर यांनी दिलेल्या माहितीनुसार, या क्लबची स्थापना २००६ मध्ये झाली असून याद्वारे तब्बल ४,९०० कुटुंबांना विविध सुविधा पुरवल्या जातात.
पालिकेने पाडलेली बांधकामे ही पूर्णपणे तात्पुरत्या स्वरूपाची होती. आम्ही २६ फेब्रुवारी २०२६ रोजी सविस्तर आराखड्यासह ही बांधकामे नियमित करण्यासाठी अर्ज केला होता आणि त्यासाठी आवश्यक शुल्कही भरले होते. या जागेवर अजूनही चटईक्षेत्र
निर्देशांक (एफएसआय) शिल्लक असल्याने कायद्यानुसार ही बांधकामे नियमित केली जाऊ शकत होती. मात्र, आमचा अर्ज पालिकेकडे प्रलंबित असतानाच ही तोडक कारवाई करण्यात आली, अशी माहिती नायर यांनी दिली. पालिकेच्या इमारत प्रस्ताव विभागाकडे अर्ज विचाराधीन असताना आणि आम्ही नोटिसीला उत्तर दिलेले असतानाही कर्मचाऱ्यांनी बांधकामे पाडल्याचे नायर म्हणाले.
न्यायालयात दाद मागणार
वकील अनुज मित्तल यांच्या तक्रारीनंतर पालिकेच्या 'के-पश्चिम' वॉर्डाने शुक्रवारी ही कथित बेकायदेशीर बांधकामे पाडली. इतर कथित बेकायदेशीर बांधकामांना पालिकेने हातही लावलेला नाही. दरम्यान, के-पश्चिम वॉर्डचे सहाय्यक पालिका आयुक्त चक्रपाणी अल्ले यांना पत्र लिहून या जागेची तपासणी करण्याची मागणी केली आहे.
बांधकामांसाठी परवानगी घेतली नव्हती
पालिका वॉर्डच्या नियुक्त अधिकाऱ्यांनी या आधी क्लबला नोटीस बजावली होती. क्लबने सक्षम प्राधिकरणाकडून आवश्यक त्या परवानग्या घेतल्या नव्हत्या. त्यानुसार, आम्ही तळमजल्यावरील शौचालये, चेंजिंग रूम आणि कॅफे यांसारखी तात्पुरती बांधकामे पाडली आहेत. यासोबतच टेरेसवरील टेनिस कोर्ट आणि बागेसाठी राखीव असलेल्या खुल्या जागेवर बनवण्यात आलेले टर्फ हटवले आहे, अशी माहिती एका पालिका अधिकाऱ्याने दिली.